योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी घटना नागपुरात घडली आहे. ३८ वर्षीय विवाहिता व तीन मुलांच्या आईने चक्क १६ वर्षीय प्रियकरासोबत पलायन केले. दोन महिन्यानंतर दोघांचाही मध्यप्रदेशातील बालाघाट येथे शोध लागला. त्यांनी तेथे संसारच थाटला होता. या घटनेमुळे पोलिसदेखील अचंबित झाले आहेत.
संबंधित महिलेची १६ वर्षीय मुलाशी काही काळाअगोदर ताजबाग येथे ओळख झाली होती. महिलेने त्याचा मोबाईल क्रमांक घेतला व ती त्याच्याशी फोनवर बोलू लागली. तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने ती कंटाळली होती. त्यामुळे तिने मुलावर प्रेमाचे जाळे फेकले. तिने अनेकदा कुणीही घरी नसताना त्याला बोलविले होते. डिसेंबर महिन्यात ती त्याला घेऊन पळाली व ते थेट बालाघाट येथे पोहोचले. तेथे तिने तिचे दागिने विकले व भाड्याने खोली घेतली. अल्पवयीन मुलगा व ती दोघेही खाजगी कामे करू लागले. मात्र मुलगा बेपत्ता झाल्याने त्याचे आईवडील बेचैन होते. त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून दोघांचा ठावठिकाणा शोधला. तेथे जाऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पालकांना सोपविले तर महिलेला पतीच्या हवाली केले. तिच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
चार महिन्यांत दोनदा अपहरणविवाहित महिलेने चार महिन्यांत दोनदा अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची बाब समोर आली. ऑक्टोबर महिन्यात तिने अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून पुण्याला नेले. वाठोडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पाच दिवसांनी अल्पवयीन मुलगा स्वतःहून परतला होता. तेव्हापासून कुटुंबियांचे त्याच्यावर बारीक लक्ष होते. त्याच्या वडिलांनी त्याला रागविल्यामुळे तो आजीकडे रहायला गेला होता. २ डिसेंबर रोजी तेथून तो महाविद्यालयाच्या बहाण्याने निघाला व महिलेने तेथून त्याला बालाघाटला नेले. तिने सोबत तिच्या नऊ वर्षांच्या मुलालादेखील घेतले होते.