उमरेड : ब्रिटिशकालीन छोट्या रेल्वे रुळाचे रूपांतर ब्रॉडगेज स्वरुपात करण्याचे काम कुही, उमरेड आणि भिवापूर परिसरात युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम, सपाटीकरणाच्या कामांसह जुन्या कार्यालयीन इमारती, गोदाम पाडली जात आहे. अशातच येत्या काही दिवसात उमरेडच्या रेल्वे स्टेशनची संपूर्ण इमारतसुद्धा पाडली जाणार आहे. मात्र ही कामे होताना येथील रेल्वे आरक्षण केंद्र सुरु राहणार आहे.
ब्रिटिश काळापासून नागपूर ते नागभीड असलेली रेल्वे व्हाया उमरेड, भिवापूर धावत होती. संथगतीने धावत असलेल्या या ‘शकुंतला’चा प्रवास गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी जीवाभावाचा होता. अशातच ब्रॉडगेजला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर डिसेंबर २०१९ पासून शंकुतलेचा प्रवास बंद झाला. ब्रॉडगेजचे कामही सुरु झाले.
काही दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने रेल्वे स्टेशनची पाहणी करीत इमारतीच्या नूतनीकरणाबाबत वरिष्ठांकडे पत्र सोपविण्यात आल्याची बाब व्यक्त केली होती. यावरून या इमारतीमध्ये सुरू असलेले आरक्षण केंद्र बंद तर होणार नाही ना, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. आरक्षण केंद्र बंद होणार नसल्याची बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितली. यापूर्वी कुही येथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद करण्यात आले होते.
त्याच वेळेत आरक्षण
उमरेड रेल्वेस्थानकावर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत रेल्वे आरक्षणाचे काम सुरू असते. केवळ रविवार वगळता इतर दिवशी यावेळेत असंख्य प्रवासी रेल्वे आरक्षणासाठी तसेच तिकीट रद्द करण्यासाठी येत असतात. दोन कर्मचारी सदर आरक्षण केंद्र चालवितात. नागरिकांचा प्रतिसादही उत्तम मिळतो. त्याच वेळेत नियमित आरक्षण केंद्र सुरू राहणार आहे.
--
इमारत तोडण्यात आल्यानंतरही उमरेडचे रेल्वे आरक्षण केंद्र बंद होणार नाही. आरक्षण केंद्र पर्यायी जागेवर सुरु राहील. प्रवाशांची कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
अधिक यादव
- वाणिज्य निरीक्षक
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे