नागपूर : प्रवीण लोखंडेच्या नाबाद ९० धावांच्या जोरावर लोकमतने शनिवारी दैनिक भास्करचा ९० धावांनी पराभव केला आणि ओसीडब्ल्यू-एसजेएएन आंतर प्रेस आमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.वसंतनगर मैदानावर खेळल्या गेलेल्या या लढतीत लोकमतने प्रथम फलंदाजी स्वीकारताना ४ बाद १७६ धावांची दमदार मजल मारली. लोखंडेने ६३ चेंडूंना सामोरे जाताना ९० धावांची खेळी केली. त्यात १४ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार अमित खोडके (२८) आणि नितीन पटारिया (२५) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. प्रत्युत्तरात खेळताना दैनिक भास्कर संघाचा डाव ९ बाद ८६ धावांत रोखल्या गेला. अविनाश भगतने नाबाद २८ तर सुजन मसिदने १५ धावांचे योगदान दिले. लोकमततर्फे शरद मिश्रा (३-१४) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. अन्य लढतीत टाइम्स आॅफ इंडियाने तरुण भारत संघाचा ५ गडी राखून पराभव केला. त्याआधी, नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार आणि माजी रणजीपटू हेमंत वसू यांच्यासोबत खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. रविवारी या स्पर्धेत हितवाद विरुद्ध लोकसत्ता-इंडियन एक्स्प्रेस (वसंतनगर मैदान) यांच्यादरम्यान सकाळी ९.३० वाजता लढत होईल. संक्षिप्त धावफलक : १) वसंतनगर मैदानलोकमत २० षटकांत ४ बाद १७६ (प्रवीण लोखंडे नाबाद ९०, अमित खोडके २८, नितीन पटारिया २५, सचिन खडके १७; श्रीकांत भालेराव व अभिनव फटिंग प्रत्येकी १ बळी) मात दैनिक भास्कर २० षटकांत ९ बाद ८६ (अविनाश भगत नाबाद २८, सुजन मसिद १५; शरद मिश्रा ३-१४, अमित खोडके २-१२). निकाल : लोकमत ९० धावांनी विजयी२) डॉ.आंबेडकर महाविद्यालय मैदानतरुण भारत १८.३ षटकांत सर्वबाद ११२(नितीन बैतुले ४०, उमेश सरदार नाबाद २२, लखन जयस्वाल १९; संदीप दाभेकर ३-१७, पीयूष पाटील ३-२७, फैझुल कमर व संदीप वर्धने प्रत्येकी २ बळी) पराभूत विरुद्ध टाइम्स आॅफ इंडिया १४.४ षटकांत ५ बाद ११३ (सुबोध रत्नपारखी ३७, पीयूष पाटील नाबाद ३२, रुपेश भाईक २२; रोशन तांबोळी २-२४).निकाल : टाइम्स आॅफ इंडिया ५ गडी राखून विजयी.
लोकमतचा दिमाखदार विजय
By admin | Updated: January 24, 2016 03:08 IST