लोकसभा नागपूर १९८०; पहिल्यांदाच ‘पंजा’, धोटेंचे ‘कमबॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:14 PM2019-03-19T12:14:02+5:302019-03-19T12:14:27+5:30

१९७७ नंतर लगेच १९८० साली देशावर निवडणुका लादल्या गेल्या. या तीन वर्षांच्या काळात देशातील राजकारण व समाजकारणात बराच बदल झाला होता.

Lok Sabha Nagpur, 1980; For the first time, 'Panja', 'Comeback' | लोकसभा नागपूर १९८०; पहिल्यांदाच ‘पंजा’, धोटेंचे ‘कमबॅक’

लोकसभा नागपूर १९८०; पहिल्यांदाच ‘पंजा’, धोटेंचे ‘कमबॅक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: १९७७ नंतर लगेच १९८० साली देशावर निवडणुका लादल्या गेल्या. या तीन वर्षांच्या काळात देशातील राजकारण व समाजकारणात बराच बदल झाला होता. जनता पक्षाच्या सरकारने अपेक्षापूर्ती न केल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर होता. विदर्भासह नागपुरात तर आणीबाणीनंतर काँग्रेसने संघटन मजबुतीवर जास्त भर दिला होता. त्यातच विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व काँग्रेसला आणखी ऊर्जा मिळाली. परिणामी १९८० च्या निवडणुकांत धोटे यांनी मागील निवडणुकांतील अपयश धुवून काढले व काँग्रेसच्या तिकिटावर थाटात ‘कमबॅक’ केले.
१९७७ च्या निवडणुकांनंतर जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी पक्षांमधील वाद वाढत गेले. शिवाय इंदिरा गांधी यांच्या विरोधातील भूमिकेमुळे जनतेमध्ये उलटा प्रभाव पडत होता. इंदिरा गांधी यांना अटक केल्यानंतर नागपुरात तर लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. पुढे अज्ञातवास संपवून इंदिरा गांधी सर्वप्रथम विदर्भात आल्या व त्यांनी पवनारला जाऊन आचार्य विनोबा भावे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच नागपूरला येऊन जनसभेत उद्बोधन केले होते. नागपुरात कॉंग्रेसची हवा अगोदरच तयार झाली होती. त्यातच निवडणुकांच्या काही काळ अगोदर जांबुवंतराव धोटे यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’च्या हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये (आय) समाविष्ट झाले. लहान पक्षांनी मोठ्या पक्षांअंतर्गत एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे त्यांचे मत होते. काँग्रेस व आपली विचारधारा एकाच दिशेची आहे. इंदिरा गांधी या संकटात आहेत व अशा स्थितीत आपण त्यांची मदत करायला हवी, असे म्हणत धोटे कॉंग्रेसमध्ये आले होते.
कॉंग्रेसतर्फे धोटे यांनाच उमेदवारी मिळाली. तर खोरिपातर्फे श्याम खोब्रागडे यांनी अर्ज भरला होता. भाकपाचे ए.बी.बर्धन यांनी परत एकदा आव्हान दिले. यासोबतच ‘फॉरवर्ड ब्लॉक’कडून कमलाप्रसाद दुबे, रिपाइंकडून दीनानाथ पंडित, जनता पार्टी (सेक्युलर)चे यू.एस.पाठक, बसपाचे रतनसिंह अदिवान हेदेखील मैदानात होते. सोबतच १६ अपक्ष उमेदवारदेखील निवडणुकीत उभे होते. लोक जनता सरकारच्या काळातील अस्वस्थता, स्थैर्याचा अभाव याला कंटाळली होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच निकाल आले.
जांबुवंतराव धोटे यांनी ५३.८५ टक्के मते मिळवत जोरदार विजय मिळविला होता. दुसऱ्यांदा ते लोकसभेत गेले होते. तर श्याम खोब्रागडे यांना २६.२२ टक्के मतं प्राप्त झाली. ए.बी.बर्धन यांच्या पदरी तिसऱ्यांदा निराशा आली व त्यांना केवळ १५.४५ टक्के मतं मिळाली. बाकीचा एकही उमेदवार एक टक्का मतांच्या वरदेखील जाऊ शकला नाही. धोटेंच्या जाण्यामुळे फटका बसलेल्या फॉरवर्ड ब्लॉकला केवळ ०.९३ टक्के मत मिळाली.

असा मिळाला कॉंग्रेसला ‘पंजा’
इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आय)ची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदा ‘पंजा’ हे निवडणूक चिन्ह मिळाले. पी.व्ही.नरसिंहराव, बुटा सिंह इत्यादी नेत्यांचे मतदेखील यावेळी विचारात घेण्यात आले होते. मात्र सर्वात अगोदर पवनार येथील बैठकीत निवडणूक चिन्हाबाबत चर्चा झाली. अगोदर जांबुवंतराव धोटे यांनी ‘सिंह’ हे चिन्ह काँग्रेसला (आय) देण्याचा सल्ला दिला. मात्र तेव्हा प्राण्यांना निवडणूक चिन्ह ठेवण्यावर बंदी होती. त्यानंतर त्यांनी चिन्ह म्हणून ‘मूठ’ दाखविली. तेव्हा तेथे उपस्थित आचार्य विनोबा भावे यांनी पंजा दाखविला. सर्वांनी लगेच त्याला होकार दिला व इंदिरा गांधी यांनी त्याला संमती दिली होती. पहिल्यांच ‘पंजा’ने निवडणुकांत जोरदार यश मिळविले होते.

Web Title: Lok Sabha Nagpur, 1980; For the first time, 'Panja', 'Comeback'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.