Lok Sabha Election 2019; आमदार अन् इच्छुकांची लोकसभा ‘सेमिफायनल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:49 AM2019-03-30T11:49:31+5:302019-03-30T11:53:23+5:30

लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे.

Lok Sabha Election 2019; Lok Sabha is 'SemiFiinal' for MLAs and interested people | Lok Sabha Election 2019; आमदार अन् इच्छुकांची लोकसभा ‘सेमिफायनल’

Lok Sabha Election 2019; आमदार अन् इच्छुकांची लोकसभा ‘सेमिफायनल’

Next
ठळक मुद्देरिझल्टवर बरेच काही अवलंबूनप्रत्येकाचा कस लागणार

कमलेश वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने सहाही विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. आता तीच आघाडी आपल्या मतदारसंघात कायम राखण्यासाठी आमदारांची परीक्षा होणार आहे. तर काँग्रेसमधील इच्छुकांचाही चांगलाच कस लागणार आहे. विशेष म्हणजे यावरून दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या परफॉर्मन्सचे एकप्रकारे आॅडिट होणार असून येणाºया ‘रिजल्ट’वर बरेच काही अवलंबून असणार आहे.
नागपुरात भाजपाचे सहा आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपुरातून निवडून गेले आहेत. पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे, पश्चिममध्ये सुधाकरराव देशमुख, मध्य नागपुरात विकास कुंभारे, उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने तर दक्षिणमध्ये आ. सुधाकरराव कोहळे नेतृत्व करतात. कोहळे यांच्याकडे तर पक्षाच्या शहर अध्यक्षपदाचाही भार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी विजयी झाले होते.
त्यावेळी दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूर या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपाला १ लाखावर मते मिळाली होती. मुस्लिमबहुल असलेल्या मध्य नागपुरात भाजपाला ९४ हजार १६२ तर रिपब्लिकन विचारांची गठ्ठा मते असलेल्या उत्तर नागपुरातही ७४ हजार ७४६ मते मिळाली होती. पश्चिम नागपुरातही ९३ हजार २५६ मतांपर्यंत भाजपाने झेप घेतली होती. मताधिक्याचा विचार करता सर्वाधिक ६५ हजार ७४२ मतांची आघाडी पूर्व नागपुरात मिळाली होती. तर त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ६२ हजार ७२३ मतांनी काँग्रेस पिछाडीवर होती. उत्तर नागपुरातही १८ हजार ५४० मतांची मुसंडी मारण्यात भाजपाला यश आले होते. अशीच आघाडी कायम ठेवण्याचे सर्वच आमदारांवर ‘प्रेशर’ आहे.
लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने सहाही मतदारसंघात झेंडा रोवला. मात्र, लोकसभेच्या तुलनेत काही मतदारसंघात मताधिक्य कमी झाले. भाजपाचे आमदार आपला गड राखण्यासाठी जसे कसून प्रयत्न करीत आहेत तशाच पद्धतीने काँग्रेसमधील इच्छुकही कामाला लागले आहेत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासमोर नागपूर शहरासह पश्चिम नागपुरात काँग्रेसचा सूर्य अस्ताला जाण्यापासूनन वाचविण्याचे आव्हान आहे. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे हे तिन्ही नेते पूर्व नागपुरात मोर्चा सांभाळून आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये प्रफुल्ल गुडधे यांचा कस लागेल. उत्तर नागपुरात मिळणारी मते नितीन राऊत यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करू शकतात. तर सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्यानंतर दक्षिणच्या गादीसाठी इच्छुक असलेले डॉ. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, प्रशांत धवड यांच्या परफॉर्मन्सचेही संयुक्त आॅडिट होणार आहे. मध्य नागपुरात इच्छुकांची संख्या १५ वर आहे. त्यामुळे अनिस अहमद यांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. लोकसभा आटोपली की तिच्या निकालावर चर्चा करता करता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपते. त्यामुळे लोकसभेत मतांची दरी कमी जास्त झाली तर ती विधानसभेत भरून काढण्यासाठी उमेदवारांकडे फारसा वेळ नसणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी प्रत्येक आमदार अन् इच्छुकाला लोकसभेची निवडणूक हीच सेमिफायनल समजून काम करावे लागणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Lok Sabha is 'SemiFiinal' for MLAs and interested people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.