नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या काळात डॉक्टर, परिचारिका उपचारात व्यस्त होते. मात्र, अटेन्डंट व स्वच्छतेचे काम दिलेल्या कंत्राटी कंपनीचे काही कर्मचारी मृत्यू झालेल्या रुग्णांचे साहित्य चोरत होते. या संदर्भात मेयो, मेडिकलला जवळपास ५०वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, मेयोमध्ये सर्वाधिक तक्रारी असलेल्या कंत्राटी कंपनीचे कर्मचारी आजही काम करीत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. परंतु एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढताच मेयो, मेडिकल, एम्ससह २०० वर असलेल्या खासगी कोविड रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले होते. मेडिकलमध्ये तर कॅज्युअल्टीमधील एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार करण्याची वेळ आली. डॉक्टरांपासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वच राबत होते. मात्र रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी व रुग्णांच्या मदतीसाठी नेमलेल्या कंत्राटी कंपनीचे काही कर्मचारी चोर निघाल्याने याचा मनस्ताप मृताच्या नातेवाईकांसोबतच रुग्णालय प्रशासनालाही झाला. मेडिकलमध्ये या संदर्भातील २० ते २५ तर मेयोमध्ये २५ ते ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने आपल्या स्तरावर कारवाई करीत संबंधित नातेवाईकांना पोलिस ठाण्यातही तक्रार करण्यास सांगण्यात आले होते.
-कानातील रिंगही काढले
मेडिकलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृताच्या नातेवाईकाने सांगितले, रुग्णालयातून प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून मृतदेह थेट स्मशान घाटावर नेल्यावर तिथे अंत्यसंस्कार करताना आईच्या कानातील रिंग चोरल्याचे लक्षात आले. तिचा मोबाईलही मिळाला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
-कपडेही सोडले नाही
अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने भावाला आहे त्या कपड्यावर मेयोमध्ये भरती केले. दुसऱ्या दिवशी नव्या कपड्याची बॅग वॉर्डातील अटेन्डंटकडे सोपविली. परंतु तिसऱ्याचा दिवशी त्यांचा मृत्यू झाला. भावाच्या अंगावर जुनेच कपडे होते. नव्या कपड्याची पिशवी, त्यांचे पैशाचे पाकीट गायब झाले होते. या संदर्भात मेयो रुग्णालयात तक्रार केली असल्याचेही एका नातेवाईकाने सांगितले.
एकूण कोरोना रुग्ण -४,७५,९२६
बरे झालेले रूग्ण -४,६३,७२३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -१,३०६
मृत्यू -८,९६७