अनिवासी भारतीय व्यावसायिक : मूळचे विदर्भाचे रहिवासीनागपूर : कृष्णकुमार टावरी यांचा पुन्हा एकदा मध्यपूर्व देशातील आघाडीच्या ४० व्यवसाय प्रमुखांच्या फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. २०१५ मध्ये अरब दुनियेच्या २२ देशांमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये त्यांना २६ वे स्थान मिळाले होते. ते मूळचे विदर्भातील आहेत, हे विशेष.कृष्णकुमार टावरी हे ओमान येथील हसन जुमा बेकर ट्रेडिंग अॅण्ड कॉन्ट्रॅक्टिंग एलएलसीचे समूह व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओमान, कतार आणि भारत असे या कंपनीचे कार्यक्षेत्र आहे. फोर्ब्स मासिकाने अरब दुनियेतील व्यावसायिक समाजाला आकार देणाऱ्या भारतीय व्यापार जगतातील नेत्यांच्या विशेष प्रयत्नांना जाणून ५० प्रमुख व्यावसायिकांची यादी जारी केली आहे. ओमानमध्ये ३० वर्षांच्या कार्यकाळात आपल्या परिश्रमाने हसन जुमा बेकर ट्रेडिंग अॅण्ड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी एलएलसी समूहाला सल्तनतमध्ये एक नामांकित कंत्राटदार म्हणून नावारूपास आणले. परिणामस्वरूप कृष्णकुमार टावरी यांना यादीत स्थान देऊन सन्मान करण्यात आला. ओमानच्या विकासात असलेल्या त्यांच्या सहभागाची तेथील मंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. भारतात मुख्यत्वे नागपुरात रिअल इस्टेट प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या के. के. असोसिएट्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सने वाडी येथे लाईफस्टाईल नावाने २२४ प्रीमियम टेरेस अपार्टमेंटची टाऊनशिप नुकतीच पूर्ण केली आहे. मध्य-पूर्वप्रमाणेच या प्रकल्पातील परिसराची विशालता आणि कार्यकुशलतेची नागपुरातील खरेदीदारांनी प्रशंसा केली आहे. टावरी यांचा उरिच ग्रेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.च्या वर्धा रोडवरील ‘ईडन पार्क’ या नवीन प्रकल्पात सहभाग आहे. या प्रकल्पात रो-हाऊसेस, स्टुडिओ, १, २, ३, ४ आणि ५ बीएचकेचे फ्लॅट आणि दुकाने आहेत. हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. ‘अपयशाने भयभीत होऊ नका, अपयश तुमच्या मेहनतीसमोर अपयशी होईल’, असे त्यांचे वाक्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांच्या कौशल्याव्यतिरिक्त भारतात अनेक लोकोपयोगी उपक्रम ते राबवितात. गावांच्या प्रगतीसाठी ते मदत करतात. कृष्णकुमार टावरी हे चॅरिटेबल ट्रस्ट चालवितात. कमलाबाई बी. टावरी मल्टी पर्पज एज्युकेशन सोसायटी असे ट्रस्टचे नाव आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथील ग्रामीणांना नि:शुल्क संगणक शिक्षण देण्यात येते. सेंटरतर्फे टॅली, हार्डवेअर, एमएससीआयटी सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्यात येतात. अशा शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण मुलांना भविष्यात शासकीय क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील, असा त्यांना विश्वास आहे.(वा.प्र.)
कृष्णकुमार टावरी फोर्ब्सच्या यादीत
By admin | Updated: September 29, 2016 02:20 IST