लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधुसंत परोपकारासाठी जगतात, नद्या परोपकारासाठीच वाहतात, सूर्य परोपकारासाठीच प्रकाश देतो, चंद्र परोपकारासाठीच शीतलता प्रदान करतो आणि वृक्ष परोपकारासाठीच फळ देतात. अशा तऱ्हेने साधुसंत परोपकारासाठी आपले आयुष्य बहाल करत असल्याचे आचार्य वैराग्यनंदी गुरुदेव यांनी विश्वशांती अमृत ऋषभोत्सवात सांगितले. श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीद्वारे आयोजित ऑनलाइन धर्मसभेत ते मार्गदर्शन करत होते.
आचार्य गुप्तीनंदी यांनी धर्मकार्याला आपल्या उपस्थितीने उजळले आहे. सर्वांना या कार्यात जोडण्यासाठी पुरुषार्थ केला, करत आहेत आणि पुढेही करत राहणार असल्याचे वैराग्यंनदी यावेळी म्हणाले. सद्य:स्थितीत संपूर्ण जगात कोरोनाचा प्रकोप आहे. त्याअनुषंगाने विश्वशांतीकरिता आचार्य गुप्तीनंदी जाप करत आहेत, विधान करत आहेत. ही भावना तीर्थंकर प्रकृतीचे द्योतक आहे. संपूर्ण जग सुखी व्हावे, असे जो विचार करतो तो खऱ्या अर्थाने सुखी होतो. जगतात आपल्याला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतात. वर्तमानात जगात सर्वात मोठी समस्या कोरोना महामारी आहे. जैन धर्मात लहान लहान जिवांची सुरक्षा प्रतिपादित केली आहे. यात सात वेदनीय कर्माचे बंधन सांगितले आहे. प्रथम तीर्थंकर आदिनाथ आणि अंतिम तीर्थंकर महावीर भगवंताने अनेकांतवाद, स्यादवाद सिद्धांत सांगितले आहे. आदिनाथांनी असी-मसी-कृषीचा संदेश दिला आहे. सोबतच अक्षरविद्या आणि अंकविद्येची व्यवस्था सांगितली आहे. त्यांनी एक ते दहा अंक आणि जिनवाणीचे ६४ रिद्धी यंत्र सांगितले. त्यांनी आपली पुत्री ब्राह्मी, सुंदरी यांना ज्ञान दिले. याच विद्येच्या आधारावर विश्वाचे संचलन होत आहे. नारळाचे वृक्ष थोडेसे पाणी पिते आणि आपण त्याच्याकडून शंभर वर्षापर्यंत उत्तम प्रतिचे पाणी घेतो. नारळाचे पाणी पिल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. भगवंताने आपणास सगळेच दिले आहे. काहीच दिले नाही, ही कल्पनाच खोटी आहे. भगवंताने ज्ञान दिले, तेच आता साधू देत आहेत. गुरु आपल्या भक्तांविषयी सतत चिंतन करत असतात. धार्मिक व्यवस्था निरंतर आहे. मृत्यूवर विजय संपादन करण्यासाठी आचार्य गुप्तीनंदी महामृत्युंजयाचे विधान करत आहेत. साधुसंतांचे आशीर्वाद असतील तर मृत्यूचे भय नसेल. भयाने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शांतीधारेच्या कवचाने व्यक्तीला कशाचीच उणीव राहत नाही. मंत्रांच्या ध्वनीने नकारात्मकता कमी होते. कुटुंबीयांसह बसून पूजा विधान कराल तर कुटुंबात एकता, सौर्हाद, प्रेम वाढेल आणि एकमेकांसाठी वेळ असल्याची भावना दृढ होईल. साधूंची गर्जना कर्णपटलावर आली की समजा साधूने स्पर्श केला आहे. भक्तामर स्तोत्रातील २३व्या श्लोकात भगवंताने मृत्यूला जिंकल्याचे सांगितले आहे. आदिनाथाने मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे, हा श्लोक अवश्य वाचा. ३०वे श्लोक वाचले तर ऑक्सिजन पातळी वाढेल. ३३वा श्लोक वाचल्यास भगवंताच्या समोशरण १८ हजार फुलांची वर्षा होते. या श्लोकाने ताप नष्ट होईल. सर्व प्रकारचे आजार ४५व्या श्लोकाने दूर होतात, असे वैराग्यनंदी यावेळी म्हणाले. याप्रसंगी आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनीही मार्गदर्शन केले. चंद्रशेखर पाटनी नेरीवाले यांनी गुरुदेवांना अर्घ्य समर्पित केले. धर्मसभेचे संचालन स्वरकोकिळा गणिनी आर्यिका आस्थाश्री माता यांनी केले.
.......