लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना कमाल जन्मठेप व अन्य शिक्षा सुनावली. ही घटना कुही तालुक्यातील आहे.सुनील संतोष कोसरे (४९) व बाल्या ऊर्फ कृष्णा साखरकर (३५) अशी आरोपींची नावे असून ते तितूर येथील रहिवासी आहेत. न्यायालयाने त्यांना भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड, कलम ४५० अंतर्गत तीन वर्षे कारावास व ५०० रुपये दंड आणि कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.शंकर संभाजी शेळके असे मयताचे नाव होते. तो कोंढई, जि. यवतमाळ येथील रहिवासी होता. आरोपी कोसरे फिर्यादी दिनेश ठाकरेच्या शेतात नोकर होता. ठाकरेने कोसरेला कामावरून काढून शेळकेला नोकर ठेवले होते. त्याचा राग कोसरेच्या मनात होता. त्यामुळे त्याने शेळकेला काम सोडून स्वत:च्या गावात परत जाण्याची धमकी दिली होती. परंतु, शेळकेने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ३० मे २०१४ रोजी रात्री आरोपींनी शेळकेला लाकडी बल्ली व लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. त्यात शेळकेच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तो ठार झाला. आरोपींनी शेळकेच्या पत्नीचा विनयभंगही केला होता. न्यायालयात शासनातर्फे अॅड. दीपिका गवळी यांनी बाजू मांडली.
हत्या केल्याच्या आरोपात दोन आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:44 IST
सत्र न्यायालयाने मंगळवारी हत्या प्रकरणातील दोन आरोपींना कमाल जन्मठेप व अन्य शिक्षा सुनावली. ही घटना कुही तालुक्यातील आहे.
हत्या केल्याच्या आरोपात दोन आरोपींना जन्मठेप
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : कुही तालुक्यातील घटना