लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी तब्बल ६८० अर्जांची उचल झाली असून, केवळ ८ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाले आहे. शेवटच्या दोन दिवसात प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही उमेदवार अर्ज सादर करतील. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गत २७ सप्टेंबर ते येत्या ४ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. आज बुधवार २ ऑक्टोबर रोजी शासकीय सुटी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला सुटी होती. आता उद्या गुरुवार ३ व शुक्रवार ४ ऑक्टोबर असे दोनच दिवस नामांकन अर्ज सादर करण्यासाठी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या पुढील दोन दिवसांमध्ये विधानसभानिहाय उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी चांगलीच गर्दी होणार, हे निश्चित आहे. उद्या, गुरुवारी काँग्रेसकडून काही उमेदवार अर्ज सादर करणार आहेत. तर शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी नागपूर दक्षिण-पश्चिमचे भाजप उमेदवार तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील सहाही भाजप उमेदवार हे शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून अर्ज सादर करणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून,७ ऑक्टोबरपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेता येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात तगडा पोलीस बंदोबस्तनिवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कार्यालय परिसरात शासकीय वाहन वगळता कुठल्याही खासगी व्यक्तींच्या वाहनास प्रतिबंध घालण्यात आला आहे. अर्ज खरेदी करताना मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात आहे. त्यातच पुढील दोन दिवस होणारी गर्दी लक्षात घेता, बंदोबस्त आणखी वाढविण्यात येणार येणार आहे. शेवटचा दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील मुख्य रस्ता बंद ठेवण्याचीही शक्यता आहे.
Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:54 IST
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी तब्बल ६८० अर्जांची उचल झाली असून, केवळ ८ उमेदवारांकडूनच अर्ज सादर झाले आहे.
Maharashtra Assembly Election 2019 :उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस
ठळक मुद्देआज-उद्या होणार गर्दी : आतापर्यंत केवळ आठ अर्ज सादर