खापरखेडा : चारचाकी वाहनाचे पंक्चर झालेले चाक बदलत असताना चाेरट्याने वाहनात ठेवलेली बॅग लंपास केली. या बॅगमध्ये राेख रक्कम व माबाईल असा एकण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हाेता. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) परिसरात शुक्रवारी (दि. २२) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
गणेश माेहनलाल गुरुदासानी (२७, रा. कामठी) हे त्यांच्या भावासाेबत खापरखेड्याहून कामठीला जात हाेते. यावेळी मध्येच वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने त्यांनी पंक्चर चाक बदलण्यास सुरुवात केली. त्याचवेळी वाहनाचे दार उघडे हाेते. या दाेघांचेही लक्ष नसताना अज्ञाताने वाहनातील बॅग चाेरून नेली. या बॅगमध्ये रोख ४० हजार रुपये आणि २० हजार रुपये किमतीचा माेबाईल असा एकण ६० हजारांचा मुद्देमाल असल्याचे गुरुदासानी यांनी पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार ठाकरे करत आहेत.