नागपूर : कुशला अखेरचे आरोपी आयुषसोबत जाताना पाहिले होते, अशी अतिरिक्त साक्ष कुशचा मित्र शुभम अशोक बैद याने कुश कटारिया अपहरण-हत्याकांड खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मृत कुशचे मित्र शुभम बैद, रिदम पुरिया आणि तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल, अशा तिघांची अतिरिक्त साक्ष शनिवारी घेण्यात आली. शुभमच्या या साक्षीवर बचाव पक्षाचे वकील अॅड. अंबरिश सोनक हे या साक्षीदाराला प्रश्न विचारताना म्हणाले की, तू सांगितलेली ही माहिती तुझ्या पोलीस बयानात का दिसत नाही. यावर विशेष सरकारी वकील अॅड. राजेंद्र डागा यांनी आक्षेप घेत न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, तपास अधिकाऱ्याने नोंदवलेल्या बयानात ही वस्तुस्थिती नमूद आहे. ‘ते’ आपण सांगितलेच नव्हतेआयुष हा एका कोपऱ्यात स्कूटरवर थांबलेला होता. कुश स्कूटरवर बसला. त्यानंतर दोघेही निघून गेले, असे आपण आपल्या बयानात पोलिसांना सांगितले नव्हते, अशी साक्ष कुशचा आणखी एक मित्र रिदम रविकिशन पुरिया याने न्यायालयात दिली. ही बाब पोलिसांनी आपणाला विचारलीच नाही. त्यामुळे त्यांना सांगितले नाही, असेही हा साक्षीदार स्वत:हून म्हणाला. सायंकाळच्या वेळी कुशचे वडील शाळेत आले असता मी आणि शुभमने त्यांना कुश आयुषसोबत स्कूटरने जाताना पाहिल्याचे सांगितले होते. घरी परत आल्यानंतर आपण कुशच्या आईलाही सांगितले होते. ही बाब आपण पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितली होती. परंतु ही बाब आपल्या बयानात का दिसत नाही, याबाबतचे कारण आपण सांगू शकत नाही. या साक्षीदाराने न्यायालयात स्वत:हून असे सांगितले की, पोलिसांनी आपणास या सर्व बाबी विचारल्या नाहीत, त्यामुळे कदाचित त्या आपल्या बयानात नमूद नसाव्यात. तपास अधिकाऱ्याची साक्षआपण साक्षीदार रिदम याचे बयान प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्याच्या सांगण्यावरून कोणताही दबाव न आणता नोंदवले होते. त्याने शाळेत सायंकाळच्या वेळी कुशच्या वडिलाला आणि घरी आईला कुशला आरोपी आयुषसोबत स्कूटरने जाताना पाहिल्याचे आपल्या बयानात सांगितले नव्हते, अशी साक्ष तपास अधिकारी नंदनवन पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी दिली.न्यायालयात बचाव पक्षाच्यावतीने अॅड. अंबरिश सोनक तर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. राजेंद्र डागा यांनी काम पाहिले. न्यायालयात आरोपी आयुष पुगलिया याला हजर करण्यात आले होते. आता पुढील सुनावणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. (प्रतिनिधी)
कुशला अखेरचे आयुषसोबत जाताना पाहिले होते
By admin | Updated: March 8, 2015 02:29 IST