वाशिम : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून त्यांचे मुळ गाव म्हातोलीतून विदर्भातील अकराही जिल्ह्यात जनजागरासाठी निघालेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या क्रांतीज्योत यात्रेने १८ ऑगस्टपर्यंत ७ जिल्हे पादाक्रांत केले आहेत.आपल्या अंतिम पाडावाच्या दिशेने मार्गक्रमन करणार्या या क्रांतीज्योत यात्रेचा समारोप चंद्रपूर येथे स्वातंत्र्यलढय़ात ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक झाली त्या ठिकाणी समारोप होणार आहे. थोर पुरुषांच्या यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नसल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने ५ ऑगस्टच्या अंकात प्रकाशीत केल्यानंतर राज्यभरात शासनाच्या यासंबंधीच्या अनास्थेविषयी तिव्र संताप व्यक्त केल्या गेला. ठिकठिकाणी यासंबंधाने निदर्शने, उपोषणे व आंदोलने झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत होउन काम करणार्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने राष्ट्रभावना जागृतीसह राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून क्रांतीज्योत यात्रा सुरु केली. राष्ट्रसंतांच्या मुळ गावातून सुरु झालेली ही यात्रा अमरावती जिल्ह्याचा काही भाग, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावतीचा उर्वरित भाग व वर्धा जिल्ह्याचा दौरा करुन १८ ऑगस्टला नागपूरात पोहचली. नागपूरातील राष्ट्रसंतांनी आपल्या हयातीत जनप्रबोधन केलेल्या सेंट्रल जेल चौक, गोळीबार चौक, झाशी राणी चौक आदी ठिकाणी राष्ट्रभावना जागृतीसह जनप्रबोधनाचे काम केले. भंडारा, गोंदीया, गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करुन झाल्यावर स्वातंत्र्यलढय़ात ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक झाली होती त्या चंद्रपूर येथील मैदानावर या क्रांतीज्योत यात्रेचा हजारो गुरुदेवभक्तांच्या साक्षीने समारोप होणार आहे. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव सन्मानाने थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनावर जनप्रतिनीधींच्या माध्यमातून दबाव वाढला असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काहींनी प्रयत्न चालविले असल्याची माहिती आहे. या क्रांतीज्योत यात्रेचे नेतृत्व ज्येष्ठ सेवाधिकारी बबनराव वानखेडे, ह.भ.प. गव्हाळे महाराज, भानुदास कराळे, रामदासदादा, पडोळेदादा व जवळपास १५ सेवाधिकारी करीत आहेत.** राष्ट्रभावना जागृतीसह राष्ट्रोध्दारक आपल्या उभ्या हयातीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली. देशाला विकासाचा मार्ग दाखविण्याचे महान काम करणार्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नावं स्वातंत्र्योत्तर काळाच्या प्रारंभीच थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट व्हायला हवे होते. परंतू राष्ट्रसंतांच्या विचाराचा आपल्या प्रत्येक कार्यात वापर करणार्या शासनाने आजतागायत यासंदर्भात दाखविलेली अनास्था कमालीची निषेधार्ह आहे. आता राष्ट्रसंतांचे लाखो गुरुदेवभक्त जागे झाले असून क्रांतीज्योत यात्रेला ठिकठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहता शासनाने जनभावनेचा आदर करुन तातडीने तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करुन त्यांचा सन्मान करावा.** शंभर ठिकाणी स्वागत अन् २६ हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन......अमरावती जिल्ह्यातून निघालेली क्रांतीज्योत यात्रा मजल दरमजल करत नागपूर जिल्ह्यात पोहचली. सात जिल्ह्यातील ४८ तालुक्यातील जनतेत राष्ट्रभावना जागृतीचे ज्योत पेटविण्यासह ८१ ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयातून जनप्रबोधन करतांना तब्बल २६ हजार विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रप्रेरक विचारांचा वसा देण्याचे काम क्रांतीज्योत यात्रेच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवाधिकार्यांनी केले. तर शंभरावर ठिकाणी क्रांतीज्योत यात्रेचे जनतेने उत्सुफूर्ततेने स्वागत केल्याची नोंद आजतागायत जनजागराचा वसा घेतलेल्या गुरुदेव सेवाधिकार्यांनी घेतली आहे.
क्रांतीज्योती यात्रेने सात जिल्हे केले पादाक्रांत
By admin | Updated: August 18, 2014 22:39 IST