अनेक दिवसांपासून सुरू होती कुरबुर : चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या दोन गटांत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान रविवारी एका तरुणाच्या हत्येत झाले. सैफ अली उर्फ शाहरुख शौकत अली (वय २६) असे मृताचे नाव असून तो महालमधील तुळशीबाग परिसरात राहत होता. त्याची हत्या करणारे आरोपी बाबल्या उर्फ लक्ष्मण दशरथ हिवराळे, विनायक इसकापे, आर.के. पटेल आणि बंटी जैस या चौघांना पोलिसांनी अटक केली.
महाल आणि गणेशपेठ भागातील काही तरुण विनाकारण वर्दळीच्या भागातून दुचाकी वेगात चालवून स्टंटबाजी करतात. आपल्या वस्तीत बाहेरचा कुणी स्टंटबाजी करत असेल तर दुसऱ्या टोळक्याचे तरुण त्याच्या वस्तीत जाऊन तशीच स्टंटबाजी करतात. यावरून दोन्ही गटांमध्ये वर्षभरापासून कुरबुरी सुरू आहेत. हाणामाऱ्या आणि वाहन तोड-फोडण्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आरोपी बाबल्या रविवारी रात्री ९ च्या सुमारास वेगात दुचाकी चालवत असल्यावरून त्याचा आदर्श समुद्रेसोबत वाद झाला. दोघांनीही त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले. तेव्हा आजूबाजूच्यांनी समजावल्याने कसेबसे प्रकरण निपटले. त्यानंतर महाल परिसरात दबा धरून आरोपी बाबल्या आणि त्याचे साथीदार विरोधी गटातील तरुणांची वाट पाहू लागले. रात्री १० वाजले तरी कुणी आले नसल्यामुळे ते आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री अकरा वाजता सैफ अली त्या भागात त्यांना एकटा असल्याचे आरोपींना कळले. त्यामुळे आरोपी बाबल्या, इसकापे, पटेल आणि बंटी हे चौघे त्याच्यावर धावून गेले. त्याला जबर मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी सैफ अली पळू लागला. मात्र आरोपींनी त्याला पकडून त्याच्या डोक्यात सिमेंटची फळी घातली. नंतर शस्त्राचे घाव घालून त्याला ठार मारले.
---
प्रचंड तणाव
या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपायुक्त लोहित मतानी आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. सैफ अलीची हत्या झाल्याचे कळल्यानंतर त्याच्या गटातील साथीदार मोठ्या संख्येत त्या भागात चालून आले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोठा पोलीस ताफा या भागात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. सोमवारी दिवसभर या भागात प्रचंड तणावाचे वातावरण होते.
---
आरोपींना मंगळवारी न्यायालयात नेणार
पोलिसांनी रात्रीपासून धावपळ करून चारही आरोपींना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
---