लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह जिल्ह्यात कोविड- १९ चा प्रकोप सुरू असताना मध्य भारतातील सुप्रसिद्ध किंग्सवे रुग्णालयाने आता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे रविवार, १८ एप्रिलपासून डेडिकेट कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनात किंग्सवे रुग्णालय व हॉटेल सेंटर पॉईंटचा हा संयुक्त उपक्रम आहे.
सध्या नागपूर शहरात कोविड रुग्णांना बेड मिळत नसताना राबविण्यात येणारा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. याचा कोविड रुग्णांना लाभ होईल. येथे कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सुविधा उपलब्ध करण्यात येतील. विशेष म्हणजे नागपूर शहर व जिल्ह्यात दररोज ६ ते ७ हजार नवीन कोविड संक्रमित रुग्ण आढळून येत असून, ६० ते ७० रुग्णांचा मृत्यू होत आहे. या तुलनेत शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात बेडची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत सामाजिक दायित्वातून किंग्सवे हॉस्पिटल व रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट यांनी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय साधून सेंटर पॉईंट येथे डेडिकेट कोविड केअर सेंटर सुरू करीत आहेत.
या कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या व ज्या कोविड रुग्णांचा सीटी स्कॅन स्कोअर ८ आहे. ऑक्सिजनची पातळी ९४ आहे. अशा रुग्णावर येथे उपचार करण्यात येतील. या दरम्यान किंग्सवे रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार पूर्ववत सुरू राहतील.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने किंग्सवे हॉस्पिटल विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जाते. गेल्या वर्षी हॉस्पिटलने कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध केल्या होत्या. यावेळीही कोविडचा वाढता प्रकोप विचारात घेता कोविड रुग्णांच्या सेवेसाठी किंग्सवे हॉस्पिटल आघाडीवर आहे. अशा स्वरूपाच्या उपक्रमामुळे हॉस्पिटलने अल्पावधीत मध्य भारतच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.
....
सौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांची सुविधा
शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांसाठी किग्सवे रुग्णालय व हॉटेल सेंटर पॉईंट यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याला परवानगी दिली आहे. यासह शहरातील अन्य हॉटेलला परवानगी देण्यात आली. यामुळे गरजु रुग्णांची सुविधा होईल.
राम जोशी, अतिरिक्त आयुक्त महापालिका.