बॉबी माकणला अपहरण - हत्याकांड : अनेकांनी मिळून केला गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:59 AM2019-05-03T00:59:19+5:302019-05-03T01:01:59+5:30

उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडात पोलिसांनी अद्याप कायदेशीर कुणालाही अटक केलेली नाही. मात्र, या हत्याकांडाचा उलगडा करण्यास मदत करेल, असे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमधून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कारही पोलिसांनी शोधली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात या अपहरण आणि हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Kidnapping and murder of Bobby Maakan : A lot of people involved | बॉबी माकणला अपहरण - हत्याकांड : अनेकांनी मिळून केला गेम

बॉबी माकणला अपहरण - हत्याकांड : अनेकांनी मिळून केला गेम

Next
ठळक मुद्देबडे मासे संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडात पोलिसांनी अद्याप कायदेशीर कुणालाही अटक केलेली नाही. मात्र, या हत्याकांडाचा उलगडा करण्यास मदत करेल, असे अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमधून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कारही पोलिसांनी शोधली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात या अपहरण आणि हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
गुरुवारी २५ मे च्या मध्यरात्री अज्ञात आरोपींनी बॉबी माकण यांचे अपहरण केले. दुसऱ्या दिवशी त्यांची कार बेवारस अवस्थेत घरापासून काही अंतरावर आढळली. पोलिसांनी २६ मेच्या दुपारी बॉबीच्या पत्नीच्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद घेतली. तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. बॉबीचा चेहरा पुरता विद्रूप झाला होता. त्यामुळे हत्येनंतर त्यांच्या चेहºयावर आरोपींनी अ‍ॅसिड टाकल्याचा संशय आहे. दरम्यान, अपहृत बॉबीची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जरीपटका, पाचपावली आणि गुन्हे शाखेची सुमारे १० पथके शोधाशोध करीत आहेत.
अपहरणाला पूर्ण सात दिवस तर हत्या झाल्याचे उघड होऊन पाच दिवस झाले आहे. या पाच दिवसांत पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून पवन मोर्यानी, लिटिल सरदार, मंजित वाडे याच्यासह डझनभर आरोपींची चौकशी केली. दुसरीकडे लिटिलचा साथीदार सिटू यालाही पंजाबमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्याच्यासोबत पोलिसांनी मिकी नामक गुन्हेगाराचीही चौकशी केली. या चौकशीतून एक एक धागा जुळवित पोलिसांना एक ठोस पुरावा हाती लागला आहे. तो म्हणजे, ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कार कुणाची होती, ती कुणाकडे होती आणि कुणी तिला अपहरणासाठी नेले, ती नावे पोलिसांना मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री एका गॅरेजमधून ही पांढरी इनोव्हा कार जप्त केली. गुन्ह्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी ती गॅरेजमध्ये पाठविण्यात आल्याचा संशय आहे.
आरोपींनी गुन्ह्यानंतर त्या कारची मागची बाजू बदलवली असून, आतमधीलही इंटेरिअरसोबतही छेडछाड केल्याचे समजते. या गुन्ह्यात सर्वात महत्त्वाची कडी असलेला आरोपी मुंबईकडे पळून गेल्याची माहिती असून, पोलीस त्यालाही शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकूणच या खळबळजनक प्रकरणाच्या अनेक कड्या पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्या जुळवून गुन्ह्याची साखळी तयार करण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहे. त्यानुसार अनेकांनी मिळून कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारातून बॉबीचा गेम केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत.
संशयित म्हणतो, मुझे अंदर डाल दो ...!
पोलीस या गुन्ह्यांतील आरोपींच्या जवळ पोहचल्याचे संकेत मिळाल्याने गुन्हेगारांची धावपळ तीव्र झाली आहे. या गुन्ह्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता निर्माण झाल्याने एक चक्रावणारी घडामोड पुढे आली. एका मुख्य संशयिताने पोलिसांना ‘मुझे अंदर डाल दो’ बाकीयोंको तकलिफ मत दो, असे म्हटल्याचे समजते. या संशयिताकडे अनेक व्याधींची प्रमाणपत्रे असल्याचे समजते. त्यामुळे पोलीस सावधगिरीने त्याच्या या भूमिकेचाही तपास करीत आहेत.

 

Web Title: Kidnapping and murder of Bobby Maakan : A lot of people involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.