लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे बहुतांश रुग्णांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत. अनेक लोकांची घरे लहान आहेत. रुग्णासाठी स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे घरातील इतरांनाही संसर्ग होण्याची भीती आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन उत्तर नागपुरातील नारी रोडवरील कपिलनगर येथील कपिलवस्तू बुद्धविहार कमिटीने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कमिटीचे अध्यक्ष तुषार नंदागवळी व सचिव मनीष भगत यांच्यासह इतर सर्व सदस्यांनी विहारातील पहिल्या माळ्यावरील सभागृह हे कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
विहारातील या सभागृहात २० ते २५ बेडची व्यवस्था केली जात आहे. यासोबतच रहिवासी भाग असल्याने विहार परिसराला टिन आणि मंडप टाकून चारही बाजूंनी बंद करण्यात आले आहे. तसेच येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टर व मेडिकल स्टॉप काही वेळासाठी उपलब्ध करून देण्यासाठी कमिटीतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच परिसरातील सेवाभावी डॉक्टरांनाही क्वारंटाईन सेंटरसाठी काही तास सेवा देण्याची विनंती करण्यात आली आहे.
बॉक्स
प्रत्येक वस्तीत व्हावे असे केंद्र
कपिलवस्तू बुद्धविहाराचे सचिव मनीष भगत यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा भाग आहे. सध्या कठीण काळ आहे. केवळ प्रशासनाच्या भरवशावर राहून चालणार नाही. समाजातील लोकांनाही पुढे यावे लागेल. आम्ही आमच्यापासून सुरुवात केली. शहरातील प्रत्येक भागात समाजभवन, मनपा शाळा आणि धार्मिक स्थळे आहेत. सध्या ते बंद आहेत. ते बंद ठेवण्याऐवजी त्यांचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो. यासाठी प्रशासनाने आमदार व स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.