सुमेध वाघमारे
नागपूर : प्रसूतीदरम्यान असह्य वेदना सहन करणाऱ्या महिलेला प्रसूतीनंतर आपल्या बाळाला छातीशी धरून ठेवणे अवघड होते. या दरम्यान नवजात बाळाला शारीरिक उष्णतेची गरज असते. ही ऊब त्याला मानसिक व शारीरिक वाढीसाठी मदत करते. यासाठी डागा रुग्णालयाने पहिल्यांदाच ‘कांगारू फादर केअर’ (केएफसी) पद्धतीला सुरुवात केली आहे. याचा फायदाही होताना दिसून येत आहे.
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात ११,०९४ प्रसूती झाल्या. यात ‘नॉर्मल डिलिव्हरी’ ४,९३९, ‘सिझर’ ६,०३० तर ‘इन्स्टुमेंटल डिलिव्हरी’ १२५ होत्या. अलीकडे बदलेली जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव व इतरही कारणामुळे मुदतपूर्व प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कमी वजनाची बाळ जन्माला येत आहेत. अशा बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ (केएमसी) पद्धती महत्त्वाची ठरते. यामुळे बाळाला ऊब आणि पोषण मिळते. परंतु प्रसूतीनंतर अनेक वेळा आईची शारीरिक आणि मानसिक स्थिती फारशी चांगली नसते. अशा परिस्थितीत वडिलांनी ही जबाबदारी उचलण्यासाठी डागा रुग्णालयाने ‘कांगारू फादर केअर’ सुरू केले आहे. यासाठी ते वडिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.
-आईचा इनक्युबेटरसारखा उपयोग
जन्मजात कमी वजन असलेल्या किंवा मुदतपूर्व प्रसूत झालेल्या बाळांच्या शुश्रुषेसाठी ‘कांगारू मदर केअर’ पद्धतीचा उपयोगासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केली आहे. यात आईकडून बाळाला होणारा स्पर्श, रात्रंदिवस स्तनांच्यामध्ये उभ्या स्थितीत घट्टपणे कवटाळून ठेवले जात असल्याने आईचा ‘इनक्युबेटर’सारखा उपयोग होतो.
-बाळाच्या वाढीसाठी ‘कांगारू फादर केअर’ प्रभावी
प्रसूतीनंतर आई असहय्य वेदना सहन करूनही बाळाला छातीशी धरते. दुसरीकडे वॉर्डाबाहेर बसलेले वडील चिंतेत असतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी डागा रुग्णालयाने ‘कांगारू फादर केअर’ हा उत्तम पर्याय निवडला आहे. नवजात बाळाला वडिलांच्या छातीजवळ ठेवल्यास एखाद्या आईने आपल्या मुलाला छातीशी धरून ठेवल्यासारखे होते. मूलदेखील त्याच्या वडिलांसोबत आरामदायक होते. बाळाच्या वाढीसाठी ही पद्धती प्रभावी ठरते.
नवजात बाळाला मिळते ऊब व भावनिक आधार
‘कांगारू फादर केअर’ तंत्रामुळे आईवरील ओझे कमी होते. तिच्या वेदनाही कमी होतात. नवजात मुलाची वडिलांसोबतची भेट खूप भावनिक असते. यामुळे वडिलांची नवजात मुलाबद्दलची ओढ वाढते. वडील बाळाला छातीशी धरत असल्यामुळे बाळाचे तापमान स्थिर राहते. कमी वजन, अशक्त बालकांसाठी ही पद्धती लाभदायक ठरते.
-डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा रुग्णालय