लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे. बाजारात निश्चित केलेल्या दररोज ५० अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कळमना बाजारात एकूण २०५ अडतिया असून त्यापैकी १५५ अडतिया मनपाने नेमून दिलेल्या शहरातील २० मैदानातील बाजारात व्यवसाय करतील.२५५ अडतियांपैकी पहिल्या ५० जणांना पहिल्या दिवशी आणि नंतरच्या ५० अडतियांना दुसऱ्या दिवशी याप्रमाणे सर्व अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ५० अडतियांपैकी १० अडतियांना कळमन्यातील न्यू ग्रेन मार्केटमध्ये, २० अडतियांना बाजारातील १ ते ५ क्रमांकाच्या गाळ्यात आणि २० अडतियांना नव्याने तयार केलेल्या सहा इमारतीतील १४४ दुकानांमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी राहणार आहे. व्यवसायादरम्यान दुचाकींना बाजारात येण्याची परवानगी राहणार नाही. केवळ तीन आणि चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश राहणार आहे. सकाळी ७ नंतर व्यवसाय करणाऱ्या अडतियांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक अडतियाला दररोज भाज्यांच्या दोन गाड्या मागविण्याचा अधिकार राहणार आहे. जास्त गाड्या मागविणाऱ्या अडतियांवरही कारवाई होणार आहे.कळमना युवा सब्जी बाजार असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, सकाळी ७ पर्यंतची वेळ फारच कमी आहे. ही वेळ सकाळी ९ पर्यंत वाढवावी, असे पत्र असोसिएशनने समिती प्रशासनाला दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून निश्चितच वेळ वाढवून मिळेल, असे गौर म्हणाले.
कळमना भाजी बाजार शनिवारपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:48 IST
भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे.
कळमना भाजी बाजार शनिवारपासून सुरू होणार
ठळक मुद्देरात्री १ ते सकाळी ७ पर्यंत : दररोज केवळ ५० अडतियांना व्यवसायाची परवानगी