नागपूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला डाॅक्टरच्या आत्महत्येप्रकरणी ‘एसआयटी’कडून चौकशी पूर्ण झाली असून, या प्रकरणातील इतरही तथ्ये सुटू नयेत म्हणून न्यायालयीन चौकशीही केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने समाजात एक संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर चौकशी केली असता यातील आरोपी गोपाल बदने व प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली. आत्महत्या केलेल्या डॉक्टराच्या हातावरील हस्ताक्षर तिचेच होते ही बाब फॉरेन्सिक व डिजिटल अहवालाने उघडकीस आली आहे. अधिकच्या तपासासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली. मृत तरुणीवर दबाव आणून अनफिट प्रमाणपत्र मिळवून घेतले जात होते. विशेष म्हणजे यासाठी तिची स्वतंत्रपणे विशेष दिनी ड्यूटी लावली जात होती. आरोपी बदने याने आधी तिला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर तिचे शारीरिक शोषण केल्याची बाब पुढे आली. ती ज्या हॉटेलमध्ये होती,
त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून, यातून आरोपी व संपूर्ण घटनाक्रमाची नोंद करण्यात आली. याप्रकरणी इतरही आरोप असल्याने तपास सुरूच असून, अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी एका न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी वारंवार तिचीच ड्यूटी का लावली जात होती, असा प्रश्न करीत हे प्रकरण दहशत निर्माण करणारे आहे, याकडेही लक्ष वेधले. नाना पटोले, ज्योती गायकवाड, अमित साटम, सुनील प्रभू यांनीही प्रश्न उपस्थित केले.
कुटुंबातील एकास नोकरी देण्याची मागणी
राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकी यांनी संबंधित आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्याची मागणी केली. मात्र, ती ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर होती. अशाप्रकरणी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही. तरीही, मानवीय दृष्टिकोनातून काय मदत करता येईल, ती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Web Summary : SIT inquiry completed; judicial inquiry ordered in Phaltan doctor suicide case. Accused arrested for abetment after exploitation. Family job request considered humanely.
Web Summary : फलटण में महिला डॉक्टर आत्महत्या मामले में एसआईटी जांच पूरी; न्यायिक जांच के आदेश। शोषण के बाद उकसाने के लिए आरोपी गिरफ्तार। पारिवारिक नौकरी अनुरोध मानवीय रूप से माना गया।