लान्सनायक दुर्वेश बडोले यांचे निधन : बाळ वडिलांच्या मायेपासून वंचितनागपूर : गेल्या १३ वर्षांपासून सैन्यदलात सेवारत असताना त्यांनी सचोटी आणि सर्वस्व झोकून प्रसंगी स्वत:च्या दु:खाला दूर सारून देशसेवेला प्राधान्य दिले. त्यांच्या कामाचे चीज बढतीच्या रूपात मिळणार हे निश्चितदेखील झाले. ही वार्ता आपल्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून सांगण्यासाठी ते उत्सुक होते. परंतु नियतीला बहुधा हे मंजूर नव्हते. देशसेवेचे अखंड व्रत घेतलेले महार रेजिमेन्टचे लान्सनायक दुर्वेश बडोले यांचे पुण्यात अकस्मात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे दुर्वेश बडोले यांची पत्नी नऊ महिन्यांची गरोदर असून जन्माला येणारे बाळ नेहमीसाठी वडिलांच्या मायेपासून वंचित झाले आहे. ३१ वर्षांचे दुर्वेश नानिकचंद बडोले गेल्या १३ वर्षांपासून भारतीय सैन्यदलाच्या महार रेजिमेन्टमध्ये कार्यरत होते. त्यांचे ‘पोस्टिंग’ पुण्यात होते. ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता ते सदैव कर्तव्यासाठी सिद्ध रहायचे. सैन्यदलात त्यांना बढतीची संधी मिळाली व त्यासाठी आवश्यक त्या चाचण्यादेखील त्यांनी उत्तीर्ण केल्या. धावण्याच्या चाचणीत तर ते सर्वात प्रथम आले होते. बढती मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले होते. मात्र ६ आॅक्टोबर रोजी अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. सर्व सोपस्कार आटोपून शनिवारी त्यांचे शव नागपुरात समतानगर येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. वैशालीनगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.(प्रतिनिधी)कुटुंबाचा आधार हरविलादुर्वेश बडोले हे त्यांच्या कुटुंबाचा आधार होते. त्यांना दोन वर्षांची लहान मुलगी असून वडील गेल्या काही काळापासून लकव्यामुळे अंथरुणाला खिळले आहेत. त्यांचा लहान भाऊ शिक्षणच घेत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने हंबरडाच फोडला. अंत्यसंस्काराच्या वेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली.
-अन् बढतीचा आनंद क्षणभरच टिकला...
By admin | Updated: October 9, 2016 02:22 IST