नागपूर : एकाच गाण्याची अनेक रूपे असतात. म्हणूनच, ही जुनी गोड गाणी नव्या दमाच्या व गोड गळ्याच्या गायकांकडून ऐकताना श्रोत्यांना मजा येते. अशाच नवप्रतिभेच्या प्रतिभावान गायकांच्या मास्टर साक्षात कट्यारमल, गौरी दामले आणि आकांक्षा जोशी यांच्या गायनाचा ‘इत्तीसी हसी’ या कार्यक्रमाचे आयोजन कनक सूर मंदिरतर्फे झाले. सायंटिफिक सभागृहात सादर झालेल्या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन कनका गडकरी यांचे होते. कार्यक्रमात सादरित नव्या-जुन्या लोकप्रिय गीतांची निवड, सहभागी युवा गायकांच्या आवाजातील गोडवा, तालासुराचे अचूक अवधान व आत्मविश्वास यामुळे हा एकूणच कार्यक्रम म्हणजे सिनेसंगीताची रंगीत अशी अनुभूती होती. ‘देवा श्रीगणेशा’ या प्रार्थना गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमात एकूण २१ नवी-जुनी गीते सादर झाली. गौरीच्या गोड स्वरातील सवार लूं, इत्तीसी हसी, इत्तीसी खुशी, पिया बावरी...या सुरुवातीला सादर झालेल्या खास गीतांना श्रोत्यांचा खास प्रतिसाद लाभला. साक्षातच्या गळ्यातील सुरेल फिरत व गायनाची प्रतिभा, यासह सादरीत बदतमिज दिल, एक चतुर नार, परदा है परदा अशा गीतांना श्रोत्यांची वन्समोअरची उत्स्फूर्त पसंती लाभली. आकांक्षाने ये मेरा दिल, नगाडे संग ढोल बाजे, दमादम मस्त कलंदर ही गीते खास अंदाजात सादर केली. आकांक्षा व गौरीने शास्त्रीय सुरावटीचे ‘डोला रे’ हे गीत सहजतेने सुरेख सादर करून आपल्या अंगभूत प्रतिभेचे प्रदर्शन केले. श्वेता शेलगावकर यांचे निवेदन तर संस्थेचे संचालक डॉ. दत्ता हरकरे, श्रीकांत पिसे व सहकलाकारांनी अनुरूप वाद्यसहसंगत केली. (प्रतिनिधी)
रंगारंग संगीताचा नजराणा ‘इत्तीसी हसी’
By admin | Updated: May 11, 2014 01:29 IST