शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ती एक काळरात्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

रस्त्याकडेच्या खड्ड्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी व्याकूळ होणारी त्याची आई किंवा जंगलातल्या खड्ड्यात पडलेल्या पिल्लाची सुटका करण्यासाठी वेडावलेला हत्तींचा कळप, ...

रस्त्याकडेच्या खड्ड्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी व्याकूळ होणारी त्याची आई किंवा जंगलातल्या खड्ड्यात पडलेल्या पिल्लाची सुटका करण्यासाठी वेडावलेला हत्तींचा कळप, इतकेच कशाला हरणाच्या पाडसाची सुटका करण्यासाठी वन्यश्वापदांची तितकीच भीती असतानाही जीव धोक्यात घालणारे मुके प्राणी, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की माणसाइतका मेंदू विकसित झालेला नसताना, भावनांचे कल्लोळ तितकेसे उचंबळणारे नसतानाही पोटच्या गोळ्यासाठी, काळजाच्या तुकड्यासाठी जीवाचा आकांत करतात. ... अन् इकडे सर्व सजीवांमध्ये हुशार समजणारा माणूस मात्र चौदा वर्षाची गोड मुलगी, तिच्या पाठीवर पाय देऊन जगात आलेला तिचा धाकटा भाऊ, जिच्यासोबत प्रेमविवाह केला व सात जन्म निभावण्याच्या आणाभाका घेतल्या अशी जीवनसंगिनी, तिची आई व बहीण अशा सगळ्यांची एकापाठोपाठ एक अशा हत्या करतो. नंतर उपरती नव्हे तर परिणामांच्या भीतीने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या करतो. नागपूरच्या सोमवारच्या या नृशंस हत्याकांडाने आपल्या सर्वांसमोर प्रश्न उभा केला आहे, की अशा घटनांवेळी संबंधिताला खरेच पशूची उपमा देता येईल. हे असे करणारा आलोक ऊर्फ चंदू माटूरकर म्हणायला माणूस असला तरी रविवारच्या रात्री त्याच्या अंगात सैतान संचारला होता. माणसाचा राग काही मिनिटे, फारतर अर्धा-एक तास टिकतो. त्यानंतर तो भानावर येतो. डोके शांत होते. पण, चंदूच्या रूपातल्या सैतानाच्या डोळ्यात संपूर्ण रात्रभर रक्त उतरले होते. अवघ्या दोनशे फूट अंतरावरच्या दोन घरांमध्ये मिळून पाच जणांचे जीव घेतले. मध्यरात्री साडेअकरा-बारापासून पहाटे पाचपर्यंत तो एकामागून एक हत्या करीत राहिला. कोवळ्या पोरीच्या डोक्यावर हातोड्याचा जीवघेणा घाव करताना, तोंडावर उशी दाबून पाेराचा तडफडून जीव घेताना, पत्नी, मेहुणी व सासूचा गळा चिरताना त्याच्यातला माणूस जणू मरण पावला होता. अंगावर भीतीचे शहारे आणणाऱ्या या घटनेनंतर एकच प्रश्न प्रत्येकांच्या ओठावर आहे, की असे कसे अकल्पित घडू शकते, असा कसा एखादा माणूस इतका निर्दयी बनू शकतो. प्रेम प्रकरण असो की अनैतिक संबंध, शरीराची भूक माणसाला इतके हिंस्र कसे बनवू शकते. आता असे स्पष्ट होऊ लागले आहे, की वरवर सोज्वळ वाटणारा माटूरकर हे प्रत्यक्षात दुभंगलेले व्यक्तिमत्त्व होते. त्याचे कृत्य पूर्वनियोजित होते. त्याला पंधरा वर्षांचा संसार मोडून टाकायचा होता. त्याच्या वेलीवर उमललेली फुले चिरडून टाकायची होती. मेहुणी त्याची होत नसेल तर कुणाचीच होऊ नये, हे नियोजन होते. सगळ्यांना संपूवन टाकायचे होते. त्याने धारदार शस्त्रे मुलीच्या नावाने ऑनलाईन मागवली होती. काळीज गोठवून टाकणाऱ्या या नरसंहाराचा अनेक अंगांनी विचार करायला हवा. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीने, स्मार्टफोनसारख्या संपर्क साधनांनी माणसांच्या आयुष्यात जितकी सुखे आणली त्याहून कितीतरी प्रमाणात विकृती निर्माण करणाऱ्या पॉर्नसारख्या संधी आणल्या. त्यातूनच एक भयंकर प्रकारची लैंगिक विकृती जन्माला आली. एकदा अशी विकृती एखाद्याच्या अंगात व सुखी संसारात शिरली की ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दु:खालाच जन्म देते. घरोघरी मातीच्या चुली असतात. संसारात पती-पत्नीची भांडणे होतात, भांड्याला भांडे लागतेच. त्याची कारणे कधी आर्थिक असतात, कधी अन्य कुठली तरी. पण, भांडण झाल्यानंतर एकमेकांना सांभाळून घेणारी घरे, त्यातील माणसांना काहीसा पश्चात्ताप होतो. मुलांचे हसरे चेहरे पाहून पती-पत्नी माघार घेतात. गोकुळ पुन्हा आनंदात न्हाऊ लागते. काही घटनांमध्ये रक्त सांडले तरी ते पाहून माणूस भानावर येतो. त्यांला पश्चात्ताप होतो. आपल्या हातून हे काय आक्रित घडले असे वाटून तो कायद्याला व परिणामांना सामोरा जातो. नागपूरच्या घटनेतील माटूरकरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसली आणि त्याचा छोटासा गारमेंटचा व्यवसाय कोरोना महामारीमुळे अडचणीत आला असला तरी केवळ गरिबीच्या वैफल्यातून रक्ताचा सडा टाकण्याइतका तो खचितच वाईट नव्हता. याचाच अर्थ आर्थिक विपन्नावस्था, गरिबी, नैराश्य वगैरे कारणे ही मुळात सबबी असतात. मुळात इतरांचा व स्वत:चा जीव घेणाऱ्याच्या माणुसकीची हत्या आधी झालेली असते. अशा घटना कधीतरी घडणाऱ्या असल्या तरी घरोघरी बोध घ्यायला हवा. थोडेसे इकडेतिकडे होत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे. एकमेकांना जपायला हवे. नाती अन् संसार प्रेमाने फुलवायला हवेत.

--------------------------------------------------