प्रभाव लोकमतचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी येथे होणाऱ्या ‘आयएमएस’ला (इंटर मॉडेल स्टेशन) वृक्षतोडीच्या मुद्यावरून प्रचंड विरोध सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेता, आता ‘आयएमएस’च्या आराखड्यातच बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. नवीन आराखडा तयार करण्यात येणार असून यात जास्तीत जास्त झाडे कशी वाचतील, यावर भर राहणार आहे. याशिवाय प्रकल्पासाठी जी झाडे हटविणे आवश्यक असेल, त्यांचे प्रकल्पातीलच मोकळ्या जागेत प्रत्यारोपण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अजनी वनातील झाडांची नियोजित कत्तल व त्यामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाश टाकला, हे विशेष.
अजनी वनासाठी होणारा विरोध लक्षात घेता ‘आयएमएस’ प्रकल्पाला गती देण्यासाठी ३१ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘आयएमएस’ प्रकल्पासाठी रेल्वे २०० एकर जागा देणार आहे. या प्रकल्पासाठी सिंचन, मेडिकल विभाग, मध्यवर्ती कारागृह, ‘एफसीआय’ यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय जी झाडे हटविणे अनिवार्य असेल त्यांचे प्रत्यारोपण एकतर प्रकल्पातील मोकळी जागा किंवा रिंगरोडवर करण्यात येईल. पुढील दोन महिन्यांत नवीन आराखडा तयार होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य मनोज कुमार, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके उपस्थित होते.
‘नीरी’तील जागा घेणार नाही
या प्रकल्पासाठी ‘नीरी’ची जवळपास दोन एकर जागा मागण्याचा ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांचा मानस होता. मात्र, गडकरी यांनी त्याला विरोध केला आहे. ही जागा अधिग्रहित करण्याची आवश्यकता नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
रेल्वे कर्मचाऱ्यांना तिप्पट सुविधा देणार
या प्रकल्पासाठी रेल्वेकडून २०० एकरची जागा देण्यात येणार आहे. यात रेल्वे कर्मचारी राहत असलेले ‘क्वाॅर्टर’देखील तुटणार आहेत. मात्र, रेल्वे कॉलनीचे पुनर्वसन करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यावर अगोदर नवीन ‘क्वाॅर्टर्स’ बनतील. कर्मचाऱ्यांना तिप्पट सुविधा मिळतील अशा प्रकारचे पुनर्वसन असेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. अजनी येथील ब्रिटिशकालीन पूलदेखील तोडण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
‘मिहान’मध्ये ‘कार्गो हब’ नको
एकेकाळी गाजावाजा करण्यात आलेल्या ‘मिहान’ येथील ‘कार्गो हब’बाबत गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले. शहराची सीमा वाढत असल्याने आता त्याला जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता नाही. विमानापुरते ते ठीक आहे. सिंदी रेल्वे येथे ‘लॉजिस्टिक हब’ उभारण्यात येत आहे. त्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यानंतर ‘इलेक्ट्रिक कार’नेच प्रवास
नागपुरात आल्यानंतर मी ‘बुलेटप्रूफ’ कारने प्रवास करतो. मात्र, प्रदूषण कमी व्हावे यासाठी यापुढे ‘इलेक्ट्रिक कार’नेच प्रवास करीन. इतर लोकप्रतिनिधींनीदेखील ‘इलेक्ट्रिक’ वाहने वापरावीत, असे आवाहन गडकरी यांनी केले. दिल्ली- मुंबई येथील महामार्गाचा प्रकल्प अर्धा झाला. मात्र, महापालिकेला महालातील केळीबाग मार्गावरील रस्ता बनविणे अद्यापही जमलेले नाही. मात्र, मी पुढे महालातच राहायला जाईल, असे म्हणत गडकरी यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला.
‘आयएमएस’च्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- ‘आयएमएस’मध्ये स्वस्त दरात भोजन देणारे ‘फूड मॉल्स’ उभारणार
- एसटी, शहर बस, खाजगी बससाठी ‘आयएमएस’ मध्यवर्ती केंद्र राहणार
- प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या ‘जेसीबी’ डिझेलऐवजी ‘सीएनजी’वर चालणार
-‘आयएमएस’पासून शहराबाहेर जाण्यासाठी कमीत कमी सिग्नल लागतील अशी व्यवस्था उभारणार
-‘आयएमएस’मधील सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागविणार
-पहिल्या टप्प्यासाठी बाराशे कोटींच्या निधीची मंजुरी
- प्रकल्पामुळे शहरातील १० हजार तरुणांना रोजगार मिळणार.