कोरोनात रेमडेसिविर-टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 09:29 AM2021-04-22T09:29:05+5:302021-04-22T09:29:34+5:30

Nagpur news; रेमडेसिविर व टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य ठरेल. त्यापेक्षा बाधितांवर पहिल्या पाच दिवसांत उपचार सुरू होणे जास्त महत्त्वाचे आहे असे मत दर्डा हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमचे संचालक डॉ. संजय दर्डा यांनी व्यक्त केले.

It is inappropriate to call Remedesivir-Tosilizumab a life saver in Corona | कोरोनात रेमडेसिविर-टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य

कोरोनात रेमडेसिविर-टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य

Next
ठळक मुद्दे बाधितांसाठी पहिले पाच दिवस गोल्डन पिरियड, उपचार सुरू होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची सगळीकडे दहशत असताना रुग्ण व नातेवाइकांकडून रेमडेसिविर व टॉसिलिझुमॅबसाठी पायपीट सुरू आहे. मात्र, प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविरसारखे इंजेक्शन द्यायची आवश्यकता नाही. फार कमी रुग्णांना याची आवश्यकता भासते. त्यामुळे रेमडेसिविर व टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य ठरेल. त्यापेक्षा बाधितांवर पहिल्या पाच दिवसांत उपचार सुरू होणे जास्त महत्त्वाचे आहे. या गोल्डन पिरियडमध्ये उपचार झाले तर रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होते, असे मत दर्डा हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमचे संचालक डॉ. संजय दर्डा यांनी व्यक्त केले. कोरोना उपचारासंदर्भातील उपचार व गैरसमज यासंदर्भात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ज्या रुग्णांचा ताप पहिले पाच ते सहा दिवस कमी होत नाही व ऑक्सिजनची पातळी खालावते त्यांना रेमडेसिविर दिले जाते. प्रत्येकाला याची आवश्यकता नाही. डॉक्टरांनीदेखील ही बाब लक्षात घ्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाधित व त्यांच्या नातेवाइकांनी मनातून गैरसमज काढायला हवा. ९० टक्के रुग्ण हे केवळ नियमित औषधांनीच ठीक होतात. १० टक्के रुग्णांना दवाखान्यात दाखल करावे लागते व तीन टक्क्यांहून कमी जणांना रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनची आवश्यकता भासते, तर अर्धा टक्के लोकांना प्लाझ्मा देण्याची वेळ येते. एका संशोधनात प्लाझ्मा दिलेल्या व न दिलेल्या प्रत्येकी ११ हजार रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. त्यात प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांना फारसा फायदा झाल्याचे दिसून आले नाही, अशी माहिती डॉ. संजय दर्डा यांनी दिली.

लवकर उपचार महत्त्वाचे, घाबरू नका

सध्या यंत्रणेवर ताण असून, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल यायला उशीर होत आहे. अनेक जण सौम्य लक्षणे असतानादेखील चाचणी करायला जात नाहीत. जर लगेच चाचणी केली तर उपचार लवकर सुरू होऊ शकतात. त्यामुळे चाचणी करायला घाबरू नये. वैद्यकीय तज्ज्ञांनादेखील उपचार देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जाण्यापासून वाचू शकतो, असे डॉ. दर्डा यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुक्त झाल्यावरदेखील काळजी घ्या

कोरोनामुक्त झाल्यावरदेखील अनेकांना थकव्यासह विविध त्रास जाणवतात. कोरोनामुळे फुप्फुसांना बाधा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वसनाशी निगडित व्यायामावर भर दिला पाहिजे. सकाळच्या वेळी योगासन, प्राणायाम केल्यास बराच फायदा होऊ शकतो. शिवाय शुद्ध व सात्त्विक आहार घेण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ. दर्डा यांनी केले.

लसीकरणात स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करावे

कोरोनावर ठोस औषध नसल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणेला मर्यादा आहेत. त्यामुळेच स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून त्यांनादेखील या प्रक्रियेत सहभागी करायला हवे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असे प्रतिपादन डॉ. संजय दर्डा यांनी केले.

Web Title: It is inappropriate to call Remedesivir-Tosilizumab a life saver in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.