नागपूर : पोलिसांनी नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान असल्याचे म्हटले आहे. फहीम खान अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चे शहराध्यक्ष आहेत. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की फहीम खान यांनी सुमारे ५०० लोकांना एकत्र करून लोकांना भडकावले, ज्यामुळे गोंधळ आणि हिंसक संघर्ष निर्माण झाला.त्यामुळे जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा धाक दाखवत परिसरात घुसून दहशत निर्माण केली होती. खानच्या भाषणामागचा उद्देश सामाजिक सलोखा बिघडवणे आणि धार्मिक तणाव निर्माण करणे असा होता. ज्यामुळे अनेक जण जखमी झाले आणि शहरात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी १७ मार्च रोजी नागपूर शहरात झालेल्या जातीय दंगलींमागील कथित सूत्रधार फहीम शमीम खानचा पहिला फोटो जारी केला. फहीम खान यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे प्रतिनिधित्व करत लढवली होती. उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा ६.५ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता.
जमावाकडून महिला पोलिसांवर अश्लील टिप्पणी नागपूरमधील हिंसाचार इतका तीव्र होता की जमावाने भालदारपुरा चौक परिसरात दगड आणि शस्त्रांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. पोलिसांच्या कारवाई विरुद्ध त्यांनी पेट्रोल बॉम्ब तयार करून फेकल्याचे पोलीस सांगतात. तसेच जमावातील काही हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांची छेद काढली. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरसीपी) मधील एका अधिकाऱ्याचा शारीरिक छळ करण्यात आला, तर इतर महिला अधिकाऱ्यांना अश्लील हावभाव आणि अनुचित व्यवहार करत त्यांच्यावर टिप्पणी करण्यात आली होती.