लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शालेय शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर विभागात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आता राज्यभरातील गुन्ह्यांची चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
नागपूर शहरातील पोलिस उपायुक्त नित्यानंद झा हे या एसआयटीचे प्रमुख आहेत. शालार्थ घोटाळ्यात जिथे-जिथे राज्यात गुन्हे दाखल झालेले आहेत तिथे-तिथे चौकशी करण्याचे काम आता ही एसआयटी करेल. विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोज शर्मा यांनी या संबंधीचा आदेश काढला आहे.
शालार्थ प्रकरणी चाळीसगाव (जि. जळगाव) येथे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस त्याची चौकशी करत आहेत. मात्र, नागपुरातील घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी नित्यानंद झा यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमलेली होती. शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याने अशा सगळ्या गुन्ह्यांचा एकत्रितपणे आणि अधिक सुलभपणे तपास व्हावा यासाठी नित्यानंद झा प्रमुख असलेल्या एसआयटीला राज्यभरातील गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार या एसआयटीमध्ये आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा अधिकार या एसआयटीला असेल. गुन्ह्यांची सर्व कागदपत्रे हस्तगत करून या एसआयटीने तातडीने कार्यवाही करावी आणि पूर्तता अहवाल सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी ८ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने नेमली आहे. स्वतः मनोजकुमार शर्मा आणि शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक हारुन अत्तार हे या एसआयटीचे सदस्य आहेत. ही एसआयटी २०१२ पासूनच्या शिक्षक भरतीची चौकशी करणार आहे.