चार वर्षापासून नागपूर जिल्ह्यातील शाळांची आरटीईची प्रतिपूर्ती थकीत आहे. २०१७-१८ मध्ये नागपूर जिल्ह्याला ५० टक्के, २०१८-१९ मध्ये २८.५ टक्के निधी देण्यात आला. तर २०१९-२० व २०२०-२१ मध्ये एकही रुपया सरकारने दिलेला नाही. पण कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद तसेच विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १०० टक्के, २०१८-१९ मध्ये ५० टक्के निधी देण्यात आला. इतर जिल्ह्यांना २०१७-१८ चा १०० टक्के निधी दिल्यावर आम्हाला का दिला नाही, असा सवाल आरटीई फाऊंडेशनने केला आहे. आरटीईचा शिल्लक निधी तातडीने वाटप करावा, निधी वाटपाची प्रक्रिया सुलभ करावी, केंद्र व राज्य सरकारचा आरटीईचा वाटा सरळ शाळांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी आरटीई फाऊंडेशनची आहे. कोरोनाच्या काळात शाळांची परिस्थिती कमकुवत झाल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे थकीत प्रतिपूर्ती जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन काळबांडे यांनी दिला.
आरटीईची प्रतिपूर्ती वाटपात नागपूर जिल्ह्यावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST