कुख्यात गजनीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:54+5:302021-04-16T04:06:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात ईप्पा गँगचा खतरनाक गुन्हेगार गजनी ऊर्फ इरफान खान रहमान खान (वय ३५, डोबी ...

The infamous Ghazni police caught a glimpse | कुख्यात गजनीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कुख्यात गजनीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुख्यात ईप्पा गँगचा खतरनाक गुन्हेगार गजनी ऊर्फ इरफान खान रहमान खान (वय ३५, डोबी नगर, मोमीनपुरा) याच्या अखेर गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी मुसक्या बांधल्या.

मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड ईप्पा आणि नौशाद यांच्या टोळीतील गुंड गजनी ऊर्फ इरफान २५ डिसेंबर २०१७ पासून फरार होता. हत्या, प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, शस्त्र तस्करी आदी अनेक गंभीर गुन्ह्यात ईप्पा आणि नौशादची टोळी सक्रिय आहे.

गरीब नवाज नगरातील फिरोज खान जाबीर खान (वय ३४) हा या गुंडांना जुमानत नव्हता. तो नेहमी या गुंडांच्या डोळ्यात डोळे टाकून उत्तर द्यायचा. त्यामुळे ईप्पा, नौशाद आणि तिच्या टोळीतील गुंडांना तो खटकत होता. या पार्श्वभूमीवर, २५ डिसेंबरला २०१७ ला आरोपी नौशाद, इरफान, इमू काल्या, हमु आणि गजनी यांनी फिरोज खानला घेरले. '' तू हमारी बात क्यू नही सुनता, हमारी तरफ आख उठाकर क्यू देखता, असे प्रश्न करून आरोपींनी फिरोजसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर आरोपी ईप्पा आणि नौशाद या दोघांनी इम्मू काल्या याला फिरोजला जीवे मारण्याचे सांगितले. त्यावरून इमू काल्याने तलवारीने फिरोजवर प्राणघातक हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत फिरोजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर फिरोज बरा झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून त्यावेळी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी इरफान खान ऊर्फ गजनी फरार होता. पोलीस तीन वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. बुधवारी तो त्याच्या स्वागत नगरातील घरी आल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने त्याच्या घराला घेराव घातला आणि आतमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या बांधल्या.

---

किचनच्या ओट्याखाली दडला

पोलीस दारावर धडकल्यामुळे कुख्यात गजनीची घाबरगुंडी उडाली. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तो चक्क किचनच्या गॅस ओट्याखाली सिलिंडरमागे दडून बसला. तर घराची पाहणी करणाऱ्या पोलिसांना गजनीच्या घरातील मंडळींनी तो घरात नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला अखेर हुडकून काढले. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टीखदानचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, हवलदार अनिल त्रिपाठी, बलजीत ठाकूर, नीलेश इंगोले, राकेश यादव, राकेश गोतमारे, वैभव कुलसंगे कुणाल कोरचे, विवेक बोटरे आणि विभा जामनिक यांनी ही कारवाई केली.

---

Web Title: The infamous Ghazni police caught a glimpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.