पाचपावलीतील घटना : मित्रानेच केला गेम नागपूर : पाचपावली बारईपुरा येथील कुख्यात गुंड डोमा याची त्याच्याच जुन्या मित्राने मारहाणीपासून वाचण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी रोशन तोटे याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत उमेश ऊर्फ डोमा शामराव चामटकर आणि आरोपी रोशन तोटे हे बारईपुरा पाचपावली येथे एकाच वस्तीत जवळपासच राहतात. दोघे जुने मित्र आहेत. परंतु डोमा नेहमीच रोशनला मारहाण करीत असे. शुक्रवारी सकाळीसुद्धा डोमाने रोशनला मारहाण केल्याची चर्चा आहे. उमेश ऊर्फ डोमा काही वर्षांंंंपूर्वी अवैध दारू विक्रीशी जुळला होता. त्याच्याविरुद्ध खुनी हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु सध्या तो चकना चौक येथील एका गॅरेजमध्ये काम करीत होता. शनिवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास रोशन घरी परतत होता. त्यावेळी डोमा आपल्या घराजवळच डोक्याखाली दारूची रिकामी शिशी ठेवून झोपला होता. डोमाला पाहून रोशन दुसरीकडे जाऊ लागला. डोमाची त्याच्यावर नजर गेली. त्याने त्याला आवाज दिला परंतु रोशन पळू लागला. दारूची शिशी फेकून मारली रोशनला पळताना पाहून डोमाने त्याला दारूची शिशी फेकून मारली. रोशन खाली पडला त्याला मार लागला. रोशन पडल्याचे पाहून डोमा त्याला पकडण्यासाठी पोहचला. परंतु रागाच्या भरात रोशनने दगड उचलून त्याच्या डोक्यावर वार केला. तसेच तुटलेली काचेची शिशी त्याच्या पोटात खुपसली. जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उमेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार होळीच्या दिवशी आणि शनिवारी सकाळी उमेशचे रोशनसोबत भांडण झाले. या कारणावरून आरोपी रोशनने उमेशचा पाठलाग करून त्याला दगडाने मारून खाली पाडले. त्यानंतर पुन्हा दगडाने ठेचले. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. (प्रतिनिधी)
कुख्यात डोमाची दगडाने ठेचून हत्या
By admin | Updated: May 25, 2014 01:01 IST