- बापूकाका चनाखेकर : संस्कार भारतीचा ‘नमन नटवरा’ उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र व बंगाल वगळता संपूर्ण भारतीय नाट्यकलेला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. ग्रीक नाटके तर नंतर आली. मात्र, आज नव नाट्य कलावंतांना भारतीयत्त्वाचा विसर पडला असून, भारतीयत्त्वाचे भान पुन्हा निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी बापूकाका उपाख्य अनिल चनाखेकर यांनी व्यक्त केले.
संस्कार भारतीच्या नाट्यविधेच्यावतीने रविवारी दी प्लॅटिनम ज्युबिली असोसिएशनच्या नवदृष्टी सभागृहात ‘नमन नटवरा’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यावेळी बापूकाका बोलत होते. व्यासपीठावर संस्कार भारतीचे कार्याध्यक्ष वीरेंद्र चांडक, नाट्यविधा नागपूरचे संयोजक निखिल टोंगळे उपस्थित होते. यावेळी कृष्णजन्माष्टमीनिमित्त पार पडलेल्या कृष्णसज्जा स्पर्धेतील विजेत्या चिमुकल्यांना पुरस्कृत करण्यात आले.
भारतात आज नाट्यकला महाराष्ट्र व बंगालमध्येच दिसून येते. उर्वरित भारतात ही कला नामशेष आहे. नाट्यकलेने समाजाला जोडले आहे आणि सांस्कृतिक उदरभरण केलेले आहे. संस्कार भारतीच्या या उपक्रमातून ही कला देशभरात तग धरत असल्याची भावना बापूकाका चनाखेकर यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर विद्याधर कुंडलिक लिखित ‘माता द्रौपदी’ या नाटकातील प्रसंगांचे अभिवाचन मयूरी टोंगळे, माणिक जोशी व ओंकार काळे यांनी केले. तद्नंतर प्रवीण खापरे लिखित ‘व्हाट अबाऊट सावरकर’ या नाटकातील प्रवेशाचे सादरीकरण गजानन जैस व खुशाल रहांगडाले यांनी केले.
पियूष मिश्रा लिखित ‘गगन दमामा बाजो’ या नाटकातील प्रवेश एकपात्री स्वरूपात ऋतुषा अवतारे यांनी सादर केला. या प्रवेशाचे दिग्दर्शन सांची जीवने यांनी केले. राम गणेश गडकरी यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातील प्रवेश श्वेता पत्की-देशपांडे व निखिल रवी टोंगळे यांनी सादर केला. तत्पूर्वी संस्कार भारती गीताचे सादरीकरण कुमारी रानडे हिने केले तर नांदीचे गायन मयूरेश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दीपा पत्की तर निवेदनाची बाजू दीपाली घोंगे यांनी सांभाळली.
...........