पावसाच्या रोषावर भारी पडला जामठ्याचा ‘जोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 10:08 PM2022-09-23T22:08:02+5:302022-09-23T22:10:22+5:30

Nagpur News ‘जा रे जा रे पावसा’ अशी प्रार्थना अखेर कामी आली अन् चाहत्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. पावसाच्या रोषावर नागपुरातील जामठ्याचा ‘जोश’ भारी पडल्याचे चित्र दिसून आले.

India Australia cricket match ; 'Jamtha's' 'enthusiasm' fell heavily on the fury of rain; | पावसाच्या रोषावर भारी पडला जामठ्याचा ‘जोश’

पावसाच्या रोषावर भारी पडला जामठ्याचा ‘जोश’

Next
ठळक मुद्देनागपूरकरांचे ‘स्पोर्ट्स स्पिरीट’ जगात भारी संयम पाळत लुटला सामन्याचा आनंद

 

नागपूर : ‘पाऊस येणार की नाही’, ‘सामना होतो की नाही’ या प्रश्नांसह क्रिकेट चाहत्यांचा दिवस सुरू झाला अन् रात्री साडेनऊ वाजता अखेर भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-ट्वेंटीऐवजी ‘आठ’ षटकांचा सामना सुरू झाला. हार्दिकने पहिला चेंडू टाकला अन् हजारो चाहत्यांच्या जीवाला लागलेला घोर अखेर संपला. ‘जा रे जा रे पावसा’ अशी प्रार्थना अखेर कामी आली अन् चाहत्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. पावसाच्या रोषावर नागपुरातील जामठ्याचा ‘जोश’ भारी पडल्याचे चित्र दिसून आले.

हा खेळ ऊन-सावल्यांचा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापेक्षा नागपुरात जास्त चर्चा सुरू होती ती पावसाची. सामन्याच्या दिवशी पाऊस येणार का? आला तर किती षटकांचा सामना होईल? आदी प्रश्नांच्या उत्तरांची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. काल दिवसभर नागपूरच्या आकाशात ऊन आणि ढगांमध्ये द्वंद रंगले असल्याने सामन्याची तिकिटे खरेदी केलेल्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. दुपारी १२ नंतर तसेच सायंकाळी सहाच्या सुमारास अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, कोणत्याही क्षणी पाऊस येणार आणि चाहत्यांचा हिरमोड होणार.

तीन वाजताच ‘वे टू जामठा’

तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्याने क्रीडा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या उत्सुकतेपोटीच त्यांनी दुपारी तीनपासून व्हीसीएस स्टेडियमकडे मार्गक्रमण केले. त्यामुळे वर्धा रोडवरील वर्दळ अचानक वाढली. स्टेडियमबाहेरही तब्बल चार तासांपूर्वीच रांगा लागलेल्या होत्या. काहींकडे तिकिटे होती तर काही कुठून तरी तिकिटांचा जुगाड होतो का, याच्या प्रतीक्षेत होते. यावेळी अनेकांनी विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचे टी-शर्ट परिधान केले होते.

‘टी-शर्ट’चा ‘टशन’ आणि तिरंग्याचा सन्मान

सामना म्हटला की, काहींना त्याचा आनंद घ्यायचा असतो तर काहींचा यातून पैसा कमवायचा प्रयत्न असतो. याचे प्रत्यंतर चिंचभुवन परिसर ते व्हीसीए स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर आले. अनेक ठिकाणी लोकांनी तिरंगा आणि क्रिकेटच्या टी-शर्टची दुकाने थाटली होती. केवळ भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या नावाचे टी-शर्ट आणि त्यांचा ध्वजही विक्रीला होता. काहींनी तर दुचाकीवरच तिरंगा बांधून घेतला होता. यावेळी विविध वेशभूषा केलेल्यांची सुद्धा कमतरता नव्हती. मात्र, तिरंग्याचा सन्मान सगळीकडे जपला जात होता.

‘हॅट्स ऑफ टू नागपूर पोलीस’

दुपार ते सायंकाळ या काळात प्रचंड प्रमाणात येणारे क्रिकेट चाहते व वाहतूक कोंडी टाळण्याचे आव्हान नागपूर पोलिसांसमोर होते. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली, मात्र पोलिसांनी तत्परतेने कोंडी सोडविण्यासाठी लगेच पुढाकार घेतला. स्टेडियमच्या आत-बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. विशेषत: काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. पार्किंग व गर्दी नियंत्रणाचे कामदेखील पोलिसांनी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडले. रात्री उशिरादेखील पोलीस अनेकांना नेमक्या कुठल्या मार्गाने जायचे, याचे मार्गदर्शन करत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही स्टेडियम परिसरात उपस्थित राहून जातीने लक्ष ठेवले. दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

नाणेफेकीला उशीर, पण चाहत्यांकडून संयम

पावसामुळे आऊटफिल्ड पूर्णत: कोरडे झाले नसल्यामुळे सामना तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाला. मात्र, दुसरीकडे दुपारी तीन वाजल्यापासून मैदानात हजेरी लावलेल्या प्रेक्षकांनी आपल्या संयमाचा बांध फुटू दिला नाही. मध्येच खेळाडूंचा सराव सुरू झाल्यावर प्रेक्षकांचा जल्लोष सुरू व्हायचा. ‘भारतमाता की जय, गणपती बाप्पा मोरया’ यासारख्या घोषणांनी चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले. आवडत्या क्रिकेटपटूंच्या नावांचाही प्रेक्षकांनी जयघोष केला. पण कुठलाही अनुचित प्रकार चाहत्यांकडून घडला नाही. तसेच शेवटपर्यंत एकाही चाहत्याने आपली जागा सोडली नाही. अनेकांनी नागपूरकरांच्या स्पोर्ट्स स्पिरीटचे कौतुक केले.

स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’

तीन वर्षांनंतर नागपुरात सामना होत असल्याने या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न होता. तिकीट विक्रीच्या वेळी त्याचा अनुभव अनेकांनी घेतला. स्टेडियमसुद्धा काठोकाठ भरलेले होते. संपूर्ण स्टेडियममध्ये एकही खुर्ची रिकामी दिसली नाही. सर्वच वयोगटातल्या चाहत्यांनी सामन्याचा आनंद घेतला. शाळेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

रवी शास्त्री म्हणाले, नागपूर माझ्या कारकिर्दीतले महत्त्वाचे ठिकाण

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नागपूरच्या आठवणींना उजाळा दिला. एका चॅनलसोबत बोलताना शास्त्री म्हणाले की, ‘नागपूर हे शहर माझ्या क्रिकेट कारकिर्दीतले महत्त्वाचे शहर आहे. मी व्हीसीएच्या जुन्या मैदानावरच खेळलेलो आहे. ज्युनियर स्तरावरचे क्रिकेट जेव्ही मी खेळायचो, तेव्हा रवि भवनमध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था केली जायची. त्यावेळी नागपूरकरांच्या आदर, सत्काराने आम्ही भारावून गेलो होतो.’ १९८३-८४ला पाकिस्तानविरुद्धची नागपूर कसोटी सर्वांच्याच आठवणीची आहे. त्यात रवी शास्त्री यांनी ५२ धावा केल्या होत्या. तसेच पाकिस्तानच्या पहिल्या डावात त्यांनी ५ बळी घेतले होते.

Web Title: India Australia cricket match ; 'Jamtha's' 'enthusiasm' fell heavily on the fury of rain;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.