प्रत्यारोपण केंद्रांना मिळणार स्वतंत्र व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:29 AM2017-08-10T02:29:10+5:302017-08-10T02:30:06+5:30

अवयवदान केल्यामुळे आपण एका व्यक्तीला नवीन जीवन देऊ शकतो ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये रुजविण्यासाठी .....

Independent ventilators to get transplant centers | प्रत्यारोपण केंद्रांना मिळणार स्वतंत्र व्हेंटिलेटर

प्रत्यारोपण केंद्रांना मिळणार स्वतंत्र व्हेंटिलेटर

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कुर्वे : अवयवदानाला प्रोत्साहनासाठी एक कोटी रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवदान केल्यामुळे आपण एका व्यक्तीला नवीन जीवन देऊ शकतो ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये रुजविण्यासाठी आयएमएसह समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा विकास निधीमधून पाच व्हेंटिलेटरसाठी एक कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अवयवदान समन्वय समितीची बैठक पार पडली. येत्या १३ आॅगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. आयएमएच्या नागपूर शाखेतर्फे अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी नियोजना संदर्भातही आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. वैशाली खंडाईत, मानद सचिव डॉ. प्रशांत राठी, अवयवदान संदर्भातील आंतरराष्ट्रीय संघटनेचे सचिव डॉ. रवी वानखेडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. सचिन हिवसे, डॉ. समीर सुरेंद्रकुमार जहागीरदार, जिल्हा शल्य चित्किसक डॉ. हेमंत निंबाळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र्र सवई, आयजीएमसीचे डॉ. सुरेश मोहता, डॉ. सविता मुकादम, राजेंद्र्र निकाजु आदी उपस्थित होते.
ब्रेनडेड झालेल्या रुग्णांची माहिती अवयवदानासंदर्भात प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या जिल्हातील सात केंद्रांना देणे अनिवार्य आहे. अवयवदानासंदर्भात अशा रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन करणे आवश्यक आहे. या संदर्भात नोडल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयएमएतर्फे सुद्धा अशा रुग्णांची माहिती प्रत्यारोपण तसेच अवयवदानासंदर्भातील रिटरिव्हल केंद्रांना द्यावी या संदर्भात सर्व सभासदांना कळवावे.
अवयवदानासंदर्भात दरमहिन्याला किमान पाच विविध अवयवदान होईल या दृष्टीने आरोग्य उपसंचालकासह आयएमएच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
जागतिक अवयवदान दिनी भव्य रॅली
जागतिक अवयवदानदिनानिमित्त १३ आॅगस्ट रोजी आयएमए तसेच जिल्हा प्रशासनातर्फे लक्ष्मीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (दीक्षाभूमी) येथून सकाळी ७ वाजता अवयवदान जागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये रोटरी क्लब, जेसीस, जनआक्रोश, मोहन फाऊंडेशन, वाहतूक शाखा, महानगर पालिका, तसेच जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील.

Web Title: Independent ventilators to get transplant centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.