नागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. अशावेळी अतिदक्षता कक्षाबाहेरील रुग्णांसाठी डोझी उपकरण उपयुक्त ठरत आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार डोझी उपकरणाच्या पूर्वचेतावणी प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डोझी उपकरण कंट्रोल रुमचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डोझी उपकरणाचे मुख्य संस्थापक मुदीत दंडवते, बधिरीकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. वैशाली शेलगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या १५०, मेडिकलमध्ये १०० तर किंग्जवे रुग्णालयात २५ डोझी उपकरण आहे. या उपकरणाद्वारे डॉक्टर दूरस्थपध्दतीने रुग्णांचे निरीक्षण करुन त्यांच्यावर उपचार करु शकतात. कोरोना संसर्गाच्या काळात हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे. गंभीर टप्यावर असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना यामुळे मदत होत आहे. यासाठी डोझी उपकरणाचा आवश्यकतेनुसार वापर करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मेयोमध्ये डोझी उपकरण लावण्यात आलेले असून याद्वारे रुग्णाच्या हृदयाची गती, श्वसनदर, रक्तदाब, स्लीप एपनिया निर्देशांक, रुग्णाचा अस्वस्थता निर्देशांक तसेच हृदयासंबंधी सर्व माहिती मिळते. हे उपकरण रुग्णाच्या गादीखाली लावण्यात येते. यामुळे रुग्णाची अस्वस्थता, रुग्णाची प्रकृती जोखमीची किंवा अतिजोखमीची आहे का, याबाबत डॉक्टरांना माहिती मिळते. या उपकरणाला वैद्यकीय भाषेत ‘स्टेपडाऊन आयसीयु’ म्हणतात.