Increase the tanker; Confiscate Tulu Pumps: Office instructions | टँकर वाढवा; टुल्लू पंप जप्त करा :पदाधिकाऱ्यांचे निर्देश
नेहरुनगर झोन येथे आयोजित पाणीसमस्या आढावा बैठकीला उपस्थित उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके व मान्यवर.

ठळक मुद्देपाणी नियोजनासंदर्भात नेहरूनगर झोनमध्ये बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपलब्ध जलसाठ्यातून नागपूर शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी पुढील महिनाभरासाठी नियोजन करा. टँकरची संख्या वाढवून टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आले.
टँकरच्या मुद्यावरून सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी रेशीमबाग व वंजारीनगर पाणीटाकीवर गोंधळ घातला. सत्तापक्षाचेच नगरसेवक गोंधळ घालून टँकरच्या फेऱ्या विस्कळीत करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील पदाधिकारी व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची नेहरूनगर झोनमध्ये बैठक घेण्यात आली. यात टँकर वाढवून टुल्लू पंप जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत नगरसेवकांनी आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, माजी महापौर प्रवीण दटके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, दुर्बल घटक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मनिषा कोठे, स्नेहल बिहारे, समिता चकोले, मंगला गवरे, वंदना भुरे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील पाणीसमस्येवर चर्चा करण्यात आली. झोनमधील प्रभावित क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. प्रभावित क्षेत्रात टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात. आयुक्तांच्या निर्देशानुसार टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
प्रत्येक वस्त्यांमध्ये समान पाणीपुरवठा करण्यात यावा, पाण्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावर्षी पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. याची जाणीव ठेवून नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा. अवास्तव पाणी वाया घालवू नये, असे आवाहन उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी यावेळी नागरिकांना केले. यासाठी व्यापक जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

 

 


Web Title: Increase the tanker; Confiscate Tulu Pumps: Office instructions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.