अर्ज भरून देण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांना घातला ५९ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 07:34 PM2023-01-11T19:34:50+5:302023-01-11T19:36:14+5:30

Nagpur News अर्ज भरून देण्याच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन सुभेदार ले-आऊट येथील शाखेतील अस्थायी कर्मचाऱ्याने ग्राहकांना ५९ लाखांचा गंडा घातला.

In the name of filling up the application form, the bank extorted 59 lakhs to the customers | अर्ज भरून देण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांना घातला ५९ लाखांचा गंडा

अर्ज भरून देण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांना घातला ५९ लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देबनावट फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्र देखील दिलेबँकेतील अस्थायी कर्मचाऱ्याचा प्रताप

नागपूर : अर्ज भरत असताना दुसऱ्यावर विश्वास ठेवणे २० ग्राहकांना अतिशय महागात पडले आहे. अर्ज भरून देण्याच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन सुभेदार ले-आऊट येथील शाखेतील अस्थायी कर्मचाऱ्याने ग्राहकांना ५९ लाखांचा गंडा घातला. त्यांनी फिक्स डिपॉझिटसाठी दिलेले पैसे त्याने ओळखीच्या बँक खात्यात वळते केले व ग्राहकांना चक्क बनावट प्रमाणपत्र देण्याचा देखील प्रताप केला. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

विपीन देवीप्रसाद कश्यप (३०,राजापेठ बसस्टॉपजवळ, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून संबंधित बँकेत अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. बँकेत येणारे खातेदार व ग्राहक यांना अर्ज देणे,वेळ पडली तर ते भरून देणे ही कामे तो करीत असतो. तो नेहमी बँकेतच भेटत असल्याने अनेक ग्राहक त्याला बँकेचा कर्मचारीच समजत होते व त्याच्याशी संवाद साधत त्याला माहितीदेखील देत होते. याचाच गैरफायदा त्याने उचलला. १८ नोव्हेंबर २०२१ ते १७ डिसेंबर २०२२ या कालावधीत त्याने २० ग्राहकांशी फसवणूक केली. त्यांचे फिक्स डिपॉझिटसाठी आवश्यक असलेले अर्ज भरून व त्यावर त्यांच्या सह्या घेऊन त्याने पैसे खात्यात जमा करण्याचा दिखावा केला. प्रत्यक्षात त्याने त्यांच्या सह्या घेतलेल्या अर्जांच्या माध्यमातून ओळखीच्या खातेदारांच्या खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे वळते केले. त्याने फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांना बनावट प्रमाणपत्रदेखील दिले. डिसेंबर महिन्यात त्याचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक पीयूष थोटे यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विपीन कश्यप याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

बँकेतील कुणाचा सहभाग ?

विपीन हा अस्थायी कर्मचारी असतानादेखील त्याने बिनदिक्कतपणे हा प्रकार केला. आरटीजीएस करून पैसे इतरत्र वळते करण्याच्या प्रक्रियेत तसेच बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात बँकेतून तर कुणाचे सहकार्य लाभले नाही ना याचादेखील पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: In the name of filling up the application form, the bank extorted 59 lakhs to the customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.