राजेंद्र मुळक यांची माहिती : सीए संस्थेचे आयोजननागपूर : व्हॅटच्या मुख्य प्रक्रियात्मक सुधारणांची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून यामुळे ट्रेड आणि इंडस्ट्रीजचे गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मुद्यांवर तोडगा निघेल, अशी माहिती राज्याचे ऊर्जा व वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी येथे व्यक्त केली.आयसीएआयच्या धंतोली येथील कार्यालयात संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. सीएंनी व्हॅट संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना मुळक यांनी समर्थक उत्तरे दिली. मंचावर डब्ल्यूआयआरसीचे उपाध्यक्ष जुल्फेश शाह, नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष अश्विनी अग्रवाल, जी.बी. इंदुरकर, आरसीएम विष्णू अग्रवाल आणि सुरेन दुरगकर होते.मुळक यांनी सांगितले की, एलबीटी अंमलबजावणीतील काही मुद्दे लवकरच सोडविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे एलबीटी मॉडेल केंद्रीय स्तरावर मान्य केले आहे. मिहानमधील वीज समस्या लवकरच निकाली निघेल. खुल्या बाजारातून वीज खरेदी करून येथील उद्योगांना ४ रुपये प्रतियुनिट दराने देण्यात येईल. त्यामुळे मिहानला प्रोत्साहन मिळेल. महसूली कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील मुद्यांवर चार्टर्ड अकाऊटंटला सर्वोपरी मदतीचे आश्वासन मुळक यांनी दिले. जुल्फेश शाह यांनी सांगितले की, करदाता कर भरण्यास तयार आहे, पण त्यांना सकारात्मक वातावरण हवे. करविषयक प्रक्रिया सरळसोप्या व्हाव्यात. प्रारंभी अश्विनी अग्रवाल यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन सुरेन दुरगकर यांनी केले. उमंग अग्रवाल यांनी पाहुण्यांची माहिती दिली. सचिव स्वप्नील घाटे यांनी आभार मानले. यावेळी कीर्ती अग्रवाल, संदीप जोतवानी, स्वप्नील अग्रवाल, ओ.एस. बागडिया, अनिरुद्ध शेनवाई, अजित गोकर्न, शंभू टेकरीवाल, संजय अग्रवाल, लक्ष्मीकांत हजारे, वाय.एस. झलके, एस.आर. तोष्णिवाल, सतीश लद्धड, अरविंद बन्साली, रीतेश मेहता, अंकुश केसरवानी, आर.डी. पारेख, सुरेश राठी आणि १५० पेक्षा जास्त चाटर्ड अकाऊटंट उपस्थित होते. (प्रतिनिधी)
व्हॅट सुधारणांची अंमलबजावणी लवकर
By admin | Updated: July 27, 2014 01:24 IST