देशातील सर्वोत्तम नागपूरचे आयआयएम ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 07:57 PM2019-03-06T19:57:36+5:302019-03-06T20:54:13+5:30

जागतिक दर्जाच्या सोईसुविधा नागपुरातील आयआयएम कॅम्पसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे हे आयआयएम देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

IIM-Nagpur will be the best in the country: Chief Minister Devendra Fadnavis | देशातील सर्वोत्तम नागपूरचे आयआयएम ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आयआयएम नागपूरच्या नवीन कॅम्पसचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, आयआयएमचे अध्यक्ष सी.पी. गुरुनानी, एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी, आ. समीर मेघे, आ. मलिकार्जुन रेड्डी, आ. सुधाकर कोहळे आणि इतर मान्यवर

Next
ठळक मुद्देआयआयएमच्या नवीन कॅम्पसचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक दर्जाच्या सोईसुविधा नागपुरातील आयआयएम कॅम्पसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे हे आयआयएम देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देशातील २० व्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरच्या नवीन कॅम्पसचे भूमिपूजन बुधवारी मिहानमध्ये करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर कोहळे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. समीर मेघे, आ. अनिल सोले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आणि आयआयएमचे चेअरमन सी.पी. गुरुनानी उपस्थित होते.
नागपुरातून वितरणासाठी कंपन्यांना रस
मुख्यमंत्री म्हणाले, नागपूरच्या आयआयएमच्या माध्यमातून व्यवस्थापन क्षेत्रात क्रांती घडणार आहे. आयआयएम सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन आहे. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नागपूर शैक्षणिक हब होत आहे. प्रारंभी मानव संसाधन नंतर कॅपिटल अशी नागपूरची वाटचाल सुरू आहे. मिहानमध्ये इंडस्ट्री, ट्रेड आणि कॉमर्सचा संगम आहे. नजीकच्या काळात एकत्रित पॅसेंजर व कॉर्गो हब पाहायला मिळणार आहे. जीएसटीमुळे देशाची एकच बाजारपेठ झाली आहे. भौगोलिकदृष्ट्या नागपूर शून्य मैलावर असल्यामुळे नागपुरातून वितरणाची साखळी विणण्यास सर्व कंपन्यांना रस आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाच्या जोडणीमुळे नागपूर हे भारताचे लॉजिस्टिक हब होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पग्रस्तांना रोजगार
मिहानमधील कंपन्यांमध्ये मिहान प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात येत आहे. भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रकल्पग्रस्त युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन मिहानमधील कंपन्यांमध्ये रोजगार देण्यात येत आहे. त्याचीच प्रचिती म्हणून युवकांना रोजगार उपलब्ध करून देताना मुख्य प्रवाहात सहभागी केले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन येणार आहे.
नागपूर झाले शैक्षणिक हब : गडकरी
आयआयएम, एम्स, आयआयआयटी, लॉ युनिव्हर्सिटी, सिम्बॉयसिस विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांमुळे नागपूर शैक्षणिक हब झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामध्ये आयआयएमचे मोलाचे योगदान राहील. गडकरी म्हणाले, इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी पीडब्ल्यूडी आणि सरकारी आर्किटेक्टकडे देऊ नये, अशी विनंती गुरुनानी यांना केली होती. त्यामुळेच कॅम्पसचे डिझाईन आंतराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे. नागपूर कॅम्पसला जागतिक स्तरावर मान्यता मिळणार आहे. गडकरी म्हणाले, नागपुरात लॉजिस्टिकचा जागतिक स्तरावर विकास होत आहे. १७०० कोटींच्या गुंतवणुकीतून रिंगरोडचे बांधकाम आणि अजनी येथील प्रवासी हबला ८०० कोटी मंजूर केले आहे. नागपूर-हैदराबाद एक्स्प्रेस हाय-वेचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. किशोर बियाणी फ्यूचर समूहाचे मुख्य कार्यालय मिहानमध्ये हलविणारअसून १० हजार युवकांना रोजगार देणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच मान्यता मिळणार आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.
आयआयएम कॅम्प्सची वैशिष्ट्ये

  •  वर्ष २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ.
  •  मिहान दहेगाव येथे १३२ एकर जमीन. तीन टप्प्यात बांधकाम.
  • पहिल्या टप्प्यात १४.९ एकरवर बांधकाम. २०२० पर्यंत पूर्ण होणार.
  •  दिल्ली येथील अहुवालिया कॉन्ट्रॅक्टर (इं.) लि.तर्फे निर्माणकार्य,
  • नागपूर आयआयएमचे अहमदाबाद आयआयएमच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलै २०१५ पासून व्हीएनआयटी नागपूर कॅम्पसमध्ये वर्ग सुरू.
  •  एमबीए डिग्रीसह व्यवस्थापनामध्ये दोन वर्षीय निवासी पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम.
  •  वर्ष २०१७ आणि २०१८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना उच्चपदस्थ रोजगार.
  •  स्टेट ऑफ आर्ट अकॅडेमिक कॉम्प्लेस, लायब्ररी, प्रशासकीय इमारत, होस्टेल, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, फॅकल्टी हाऊस, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटर, एन्टरप्रिनरशिप इन्क्युबेशन सेंटर.

Web Title: IIM-Nagpur will be the best in the country: Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.