योगेश पांडे- नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क: युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात पत्रपरिषद घेऊन पैसे दिले नसल्याचा आरोप व्हेंडर प्रशांत गायकवाडने लावला होता. मात्र पनवेलनिवासी गायकवाडविरोधात आता सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रॅलीत कार्यकर्ते आणल्याने मला दहा लाख रुपये पाहिजे अशी मागणी त्याने राऊत यांच्याकडे केली. राऊत यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता त्यांच्या घरी जाऊन त्याने दहा लाख रुपये दिले नाही तर बदनामी करून राजकीय कारकिर्दच बदबाद करतो या शब्दांत धमकी दिल्याची तक्रार राऊत यांनी केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
राऊत यांच्या तक्रारीनुसार, १५ ते १९ मार्च या कालावधीत पुणे ते मुंबई युवा आक्रोश यात्रा आयोजित करण्यात आली होती. गायकवाडने त्या यात्रेत काही कार्यकर्ते आणल्याचा दावा करत राऊत यांना पैसे मागितले होते. त्याने वाददेखील घातला होता. त्याने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यात तथ्यहिन माहिती टाकण्यास सुरुवात केली. राऊत यांनी त्याचे फोन उचलणे बंद केले. २६ एप्रिल रोजी तो राऊत यांच्या घरी एका साथीदारासोबत आला. राऊत घरी नसताना त्याने त्यांच्या एका नातेवाईकाशी वाद घातला. दहा लाख रुपये नाही दिले तर राजकीय कारकिर्दच बरबाद करतो अशी धमकी दिली. नागपुरात परत आल्यावर राऊत यांनी गायकवाडविरोधात तक्रार केली. पोलिसांनी गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांअगोदर गायकवाडने कॉंग्रेसच्या रॅलीतील कंत्राटाच्या कामांचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप केला होता.