नागपूर : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक झाले, अशा हेडलाइन आल्या. मग २६ जानेवारीला शेतकऱ्यांना दहशतवादी जाहीर केले. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या राकेश टिकैत यांना त्रास दिला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले ते भाजप नेत्यांना दिसले नाहीत. मोदींचे अश्रू मगरीचे असून जनतेने आता ते ओळखले आहेत. मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे. लोकशाहीत असा ड्रामा आता कुणीही सहन करणार नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पटोले यांचे बुधवारी दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. यावेळी विमानतळावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी दीक्षाभूमी, गणेश टेकडी मंदिर व मोठा ताजबाग येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर नेम साधला. ते म्हणाले, अन्नदाता हा प्रमुख घटक अहे. पण मोदींनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. एवढी क्रूरता दाखविली. याचा हिशेब आता जनता घेणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह संपूर्ण जनतेला आम्ही हे तीन काळे कायदे समजावून सांगू. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हे भाजपने देशाला शिकवू नये. पंतप्रधान मोदी लोकसभेत उभे राहून आंदोलनजीवी अशी उपरोधिक टीका करतात. ही नवी परंपरा त्यांनी सुरू केली. हे त्यांचे नवे देशप्रेम लोकांनी ओळखले आहे.
विमानतळावर पटोले यांच्या स्वागतासाठी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, आ. अभिजित वंजारी, आ. राजू पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रिपद माहीत नाही पण कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली
- आपल्याला ऊर्जामंत्रिपद किंवा दुसरे कुठलेही मंत्रिपद मिळो न मिळो, पण माझ्या प्रदेशाध्यक्ष होण्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. जनतेतही ऊर्जेचा संचार आहे व त्याचीच जास्त चर्चा होत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमीच आक्रमक राहील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.