नागपूर : येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्थेचा आणि आंध्र प्रदेशातील व्यंकटरमणागुड्डेम येथील वायएसआर उद्यान विद्यापीठामध्ये सोमवारी संशोधन सहयोग करार झाला.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळपिके संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष आणि वायएसआर उद्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. जानकीराम यांनी एका आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून दृक्श्राव्य माध्यमाद्वारे हा सामंजस्य करार केला. या करारानुसार, स्नातकोत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना येथील वैज्ञानिकांच्या देखरेखीखाली अभ्यासक्रम करणे यापुढे सोयीचे होणार आहे. तर आंध्र प्रदेशातील फळबागायतदारांना नागपूरच्या संस्थेकडून तंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे. लिंबुवर्गीय फळ उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश बरेच प्रगत आहे. या तंत्रज्ञानामुळे देशाच्या उत्पादकतेमध्ये अधिक भर पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विविध प्रादेशिक संस्थांचे प्रमुख, नागपुरातील प्रमुख वैज्ञानिक आणि वरिष्ठ अधिकारी डॉ. ए.डी. हुच्चे, डॉ. आर.डी. सोनकर, डॉ. आशिषकुमार दास, डॉ. दिनेशकुमार, डॉ. टी.जी. बेहरे, डॉ. प्रशांत तेजकुमार, लिली वर्गीस आदी उपस्थित होते.