Priya Fuke parinay phuke news: 'माझ्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर मी त्यांच्या मालमत्तेबद्दल आणि पैशाबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा मला तू कोण आहेस? तुला हे विचारण्याचा हक्क काय आहे? असे म्हणत रात्री घराबाहेर काढले. इतकंच नाही, तर मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या', असे गंभीर आरोप प्रिया फुके यांनी आमदार परिणय फुके यांच्यावर केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रिया फुके यांची नागपूरमध्ये भेट घेतली. त्यानंतर प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला.
प्रिया फुके यांचे परिणय फुकेंवर आरोप काय?
आमदार परिणय फुके यांचे दिवंगत भाऊ संकेत फुके यांचे प्रिया फुके यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांचे आजारामुळे निधन झाले. त्यानंतर हा वाद सुरू झाला.
वाचा >>वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
प्रिया फुके यांनी सांगितले की, 'संकेत फुके यांच्यासोबत माझे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी संकेत यांना किडनीचा आजार असल्याचे समजले. लग्नाच्या वेळी त्यांना हा आजार असल्याचे माझ्यापासून लपवले गेले होते. दोन वर्षांनी त्यांची किडनी बदलण्यात आली होती.'
'२०२२ मध्ये संकेत यांचे निधन झाले. त्यामुळे मी माझ्या पतीच्या पैशांच्या व्यवहाराबद्दल आणि मालमत्तेबद्दल घरात विचारणा केली. तेव्हा तू कोण आहे, असे म्हणत १० वाजता घरातून बाहेर काढले गेले. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू असे मला परिणय फुके यांच्याकडून धमकावण्यात आले. मला दोन लहान मुलं आहेत. मुलांसाठी पतीच्या संपत्तीतून हक्काचा हिस्सा मागितल्यानंतर त्रास देणं सुरू झाले. माझ्यावर अॅट्रोसिटीसारखे खोटे गुन्हे मागील दीड वर्षांपासून दाखल केले जात आहेत. मला पोलीस ठाण्यात बोलवलं जात आहे. दोन लहान मुलांसह तासन् तास बसवून ठेवलं जात आहे. हे अमानवीय आहे', असे प्रिया फुके म्हणाल्या.
सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना केली विनंती
या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, 'पोलिसांची भूमिका प्रिया फुके यांच्याविरोधात राहिली आहे. त्यांना आरोपाचे पुरावे सादर करा म्हणून पोलीस समन्स पाठवतात, त्यामुळे आम्ही हे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही. आरोपीच्या तक्रारीवरून मात्र अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. प्रिया फुके या लढाईत एकटी पडली होती. त्यामुळे आम्ही तिच्यासोबत उभ आहोत.'
'आपल्याकडे हिंदू विवाह कायद्यानुसार संपत्तीवर अधिकार असतो. संकेत फुके यांचा मृत्यू आजाराने झाला आहे. त्यामुळे सुनेने संपत्ती मागणे स्वाभाविक आहे. महिला आयोग पक्षाच्या कामात व्यस्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की चौकशीच्या नावावर होणारा त्रास थांबवावा', असे सुषमा अंधारे म्हणाल्या.