फुले-आंबेडकर विचारधारा : राजा ढाले यांचे प्रतिपादन नागपूर : मानवांच्या उन्नतीकरिता सर्वप्रथम त्याचा मेंदू स्वतंत्र करायला हवा. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने माणसाला बंधमुक्त केले. नवीन मार्ग दिला. येथील कला, संस्कृती, व्यापार, वृद्धिंगत होत गेली व त्यामुळे सर्व जग माणसातील मैत्रीमुळे जवळ आले. त्यामुळे माणसातील माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी येथे केले. फुले, आंबेडकर विचारधारातर्फे धम्म क्रांतीदिनानिमित्त मधुरम सभागृह हिंदी मोरभवन झांशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. राजा ढाले पुढे म्हणाले, या देशाला बौद्धिकदृष्ट्या डोळस करायचे असेल तर येथील लोकशाही बळकट करायला हवी. लोकशाही शिवाय कुणालाही तरणोपाय नाही. जोपर्यंत या देशात गुलामांचा धर्म अस्तित्वात आहे तोपर्यंत लोकशाही असूनही हुकूमशाही टिकणार आहे, आणि ही हुकूमशाही पुन्हा पेशवाईच्या तंत्रात आपणास गुलाम करणारी आहे. जोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता आहे, तोपर्यंत माणुसकीचा झरा सतत वाहत राहणार आहे. या देशातील तळागाळातला माणूस उंच शिखरावर पोहोचू शकतो. स्त्री पुरुष समानता गप्पा मारून होणार नाही. तर त्याकरिता खांद्याला खांदा लावून हा वैचारिक लढा पुढे नेण्याची गरज आहे. आमचे आदर्श बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर यांनी आपल्या स्वकर्तृत्त्वाने सिद्ध केलेले आहे. आमचे ध्येय व धोरण त्यांच्याच मार्गाने जाणारे आहे. याप्रसंगी डॉ. इंदिरा आठवले, डॉ. विमलकिर्ती यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अग्निवेश शेलारे यांनी केले. प्रा. प्रशांत नगरकर यांनी आभार मानले. मिलिंद बनसोड, पांडुरंग मानकर, सारीपुत्र नगरकर, सिद्धार्थ मेश्राम, अशोक बोरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माणसातील माणुसकीच श्रेष्ठ
By admin | Updated: October 19, 2014 01:00 IST