संत्रा ज्यूसचा उपयोग कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये कसा करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:53 AM2017-12-19T11:53:21+5:302017-12-19T11:53:40+5:30

पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली.

How to use Orange juice in cocktail and mocktail? | संत्रा ज्यूसचा उपयोग कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये कसा करायचा?

संत्रा ज्यूसचा उपयोग कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये कसा करायचा?

googlenewsNext
ठळक मुद्देमिक्सोलॉजिस्ट डायनॅमिक शातभी बसूंनी शिकवले ड्रिंक्स मिक्सिंगचे तंत्र

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली. सिव्हिल लाईन्स येथील पॅबलो रेस्टॉरन्टमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. अल्कोहोलिक व नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये रुची ठेवणारे व्यक्ती, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील विद्यार्थी व बार टेंडर म्हणून कार्यरत असणारे तरुण यांनी बसू यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
बसू मुंबई येथे सुमारे ४० वर्षांपासून बार टेंडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कौशल्याने देशभरात नाव कमावले आहे. या क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी त्या आदर्श आहेत. त्यांनी कार्यक्रमात बोलताना वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची प्रशंसा केली. तसेच कॉकटेल्स व मॉकटेल्समध्ये संत्री, संत्रा जाम, संत्रा ज्यूस इत्यादीचा कसा प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो याची माहिती दिली व त्यासंदर्भात प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यांनी तयार केलेले मिक्स्ड ड्रिंक्स प्रेक्षकांना वितरित करण्यात येत होते. प्रेक्षकांनी त्यांच्या प्रत्येक मिक्स्ड ड्रिंकला मनापासून दाद दिली. बसू यांनी ग्लास रिम तयार करण्यासंदर्भातही माहिती दिली.
मिक्स्ड ड्रिंक्स तयार करण्याचे तंत्र सांगताना त्यांनी अन्य विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना स्वत:ला बार टेंडर म्हणवून घेणे आवडत नाही. ते स्वत:ला मिक्सोलॉजिस्ट संबोधतात. परंतु त्यांनी बार टेंडर हा सुद्धा चांगला शब्द असल्याचे लक्षात घ्यावे. उत्तम बार टेंडर झाल्याशिवाय कुणीही उत्तम मिक्सोलॉजिस्ट होऊ शकत नाही, असे बसू यांनी सांगितले. बार टेंडरने नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवायला हवे. ग्राहकांचा सन्मान करायला हवा. ग्राहकांचे समाधान कसे होईल, हाच विचार बार टेंडरने करायला पाहिजे, तसेच आपल्याला रोज नवीन काय करता येईल, यासंदर्भात संशोधन करणे आवश्यक आहे. ड्रिंक्सबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आढळून येतात. त्यांचे गैरसमज दूर करण्याची व त्यांना योग्य माहिती देण्याची जबाबदारी बार टेंडरची आहे, याकडे बसू यांनी लक्ष वेधले. बसू यांनी स्वदेशी ड्रिंक्सचे जोरदार समर्थन केले. आपल्याकडे चांगले मिक्स्ड ड्रिंक्स तयार करण्यासाठी अनेक वस्तू उपलब्ध आहेत. त्यामुळे विदेशी वस्तूंचा उपयोग करण्याची गरज नाही. उलट विदेशी लोकांना शिकविण्यासाठी व सांगण्यासाठी आपल्याकडेच ज्ञानाचे मोठे भांडार आहे, असे बसू यांनी सांगितले.

 

Web Title: How to use Orange juice in cocktail and mocktail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.