नागपूर : वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यात आलेल्या रविना व पूजा या दोन मुलींचे पुनर्वसन कसे कराल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फ्रिडम फर्म या सामाजिक संस्थेला करून यावर १५ डिसेंबरपर्यंत ठोस प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, या मुली वेश्या व्यवसायात परत जायला नको असे मत व्यक्त केले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. फ्रिडम फर्म ही संस्था वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींना सुरक्षित जीवन प्रदान करण्यासाठी कार्य करते. पोलिसांनी या संस्थेच्या मदतीने रविना व पूजा यांना गंगा जमुना येथील वेश्या व्यवसायातून बाहेर काढून सरकारमान्य आश्रयगृहात ठेवले होते. दरम्यान, दोन्ही मुली सज्ञान झाल्यामुळे त्यांनी सुटकेकरिता उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यात आदेश देताना उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता या मुली सुटका होण्यास पात्र असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, मोकळे सोडल्यानंतर त्यांना कुणी वेश्या व्यवसायात ढकलू नये किंवा त्या स्वत: पुन्हा या व्यवसायात परतू नये अशी चिंता व्यक्त केली. याकरिता फ्रिडम फर्म संस्थेने मुलींच्या पुनर्वसन व रोजगारासंदर्भात ठोस प्रस्ताव सादर करावा. तत्पूर्वी संस्थेच्या प्रतिनिधींनी मुलींचे समुपदेशन करावे असेही न्यायालयाने सांगितले. याशिवाय न्यायालयाने सदर मुलींना मनोधैर्य व उज्ज्वला या सरकारी योजनेंतर्गत भरपाई मिळण्यासदेखील पात्र ठरवले.