लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कधी काळी नागभूमीची जीवनदायिनी असलेली नाग नदी आता शहरातील सिवरेज वाहिनी बनली आहे. नदीत सोडण्यात येणारे सिवरेज रोखल्याशिवाय नदीचे पुनरुज्जीवन शक्य नाही. दुसरीकडे सिवरेज बंद झाले तर नदी कोरडी पडणार आहे. नदीला पुनरुज्जीवित करावयाचे झाल्यास नदीपात्रात शुद्ध पाण्याचा प्रवाह असणे आवश्यक आहे. हे स्वप्न वास्तवात येणे वाटते तितके सोपे नाही. मात्र स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पारडी घाटाच्या पुढे नाग नदीला संरक्षण भिंत नाही. पुढे पावनगावजवळ नाग नदीला पिवळी नदी मिळते. या दोन्ही नद्यांच्या संगमालगत पुनापूर, भरतवाडा परिसरात स्मार्ट सिटी उभी राहत आहे. स्मार्ट सिटीत स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा व सर्वदृष्टीने राहण्यायोग्य शहर अपेक्षित आहे. सुरुवातीला स्मार्ट सिटी प्रकल्पात नागपूरचा काही महिने प्रथम क्रमांक होता. आता नागपूर माघरले.
दोन्ही नद्यातून वाहत असलेल्या गटाराच्या काठावर खरोखरच स्मार्ट सिटी निर्माण कशी होईल, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे.
....
पारडी ते पावनगाव कुठेकुठेच भिंत
पारडी घाटापासून पुढे नाग नदीच्या काठावर गंगाबाग, दुर्गानगर, भवानीनगर, भरतवाडा, पुनापूर व पावनगाव यासह लहानसहान वस्त्या आहेत. पारडी घाटापर्यंत नाग नदीला संरक्षण भिंत आहे. परंतु पुढे काही भाग सोडला तर नदीला संरक्षण भिंत नाही. यापुळे नदीतील गटाराच्या दुर्गंधीमुळे नदीकाठावरील नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर या भागातील परिस्थिती भीषण असते. नदीला पूर आला की आजूबाजूच्या वस्त्यात पाणी साचते. नाग व पिवळी नदीच्या संगम परिसरात पुराचे पाणी तुंबल्याने परिसराला धोका निर्माण होतो. यासाठी नदीपात्र विस्तृत करून संरक्षण भिंत घालण्याची गरज आहे. असे असतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी या परिसराची निवड करण्यात आली आहे.
....
उत्तर नागपुरातील सिवरेज वाहिनी
पिवळी नदी नव्हे तर उत्तर व पश्चिम नागपुरातील सिवरेज वाहिनी बनली आहे. नागपूरच्या पश्चिमेकडील लावा-ढाबा गावात उगम असलेली पिवळी नदी गोरेवाडा व पुढे के.टी. नगर, हजारी पहाड, गंगासागर, फ्रेन्ड्स कॉलनी, काटोल रोड, गिट्टीखदान, बोरगाव, नारा, नारी यासह पश्चिम व उत्तर नागपुरातील वस्त्यांची सिवरेज वाहिनी बनली आहे. नाग नदीप्रमाणे या नदीकाठावर घरे वसलेली आहेत. पुढे या नदीला चांभारनाला मिळतो. या नाल्याला गटाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
....
चांभारनाल्यात डुकरांचा संचार
मध्य नागपुरातील चांभारनाल्यालाही गटाराचे स्वरूप आले आहे. या नाल्यात डुकरांचा मुक्तसंचार असतो. पुढे हा नाला पिवळी नदीला मिळतो. नाल्याची संरक्षण भिंत जागोजागी पडली आहे. पावसाळ्याच्या दिवसात नाल्याच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या वस्त्यात शिरते. नाग नदीचे पुनरुज्जीवन करताना या नाल्याचेही पुनरुज्जीवन तितकेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय नाग नदी शुद्ध होणार नाही. यासाठी मनपाने प्रकल्प राबविण्याची गरज आहे. परंतु बिकट आर्थिक स्थितीचा विचार करता, तूर्त असा कोणताही प्रकल्प राबविला जाईल याची शक्यता दिसत नाही.