नागपूर : मागील १५ वर्षांपासून नागार्जुन कॉलनी नारा रोड परिसरात राहणाऱ्या सुजाता अवचित नागदेवे यांचे घर काही असामाजिक तत्त्वांनी बुलडोझरच्या साहाय्याने नेस्तनाबूत केले. घर पडल्याने नागदेवे कुटुंबीय भर पावसात रस्त्यावर आले आहेत. पीडित सुजाता नागदेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मागील काही दिवसांपासून बिल्डर आणि भाजपा उत्तर नागपूरचे अध्यक्ष विक्की कुकरेजा यांच्यातर्फे घर सोडण्यासाठी धमकी दिली जात आहे. गेल्या ८ जून रोजी कुठलीही नोटीस न देता काही लोकांनी बुलडोझरच्या साहाय्याने त्यांचे घर नेस्तनाबूत केले. सुजाता या हातठेल्यावर भाजीपाला विकतात. त्यांचे पती कॉटन मार्केटमध्ये हमाल आहेत. त्यांचा एक मुलगा ड्रायव्हर आहे तर सुजाताची मुलगी सुकेशनी यांचेही घर तिथेच आहे. दोघेही आपल्या कुटुंबासह १५ वर्षांपासून तिथे राहत होते. घर खाली करण्यासाठी काही गुंड मला जीवे मारण्याची धमकी देत असल्याबाबत आपण जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला. परिणामी ८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता नासुप्रचे अधिकारी मोरे यांच्या नेतृत्त्वात काही कर्मचारी आले. त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता घरातील सामान जप्त केले. त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी घरावर बुलडोझर चालविला. याबाबतही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी मला व माझ्या मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली. मुलगा ठाण्यात आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.(प्रतिनिधी)
गरीब दलित महिलेचे पाडले घर
By admin | Updated: June 21, 2014 02:39 IST