लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : सिल्ली (ता. कुही) येथील घराला लागलेल्या आगीत घरातील काही साहित्य जळाले. यात किमान एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगपीडिताने दिली. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली असून, ही घटना बुधवारी (दि. ६) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
मोरेश्वर वैद्य, रा. सिल्ली, ता. कुही हे शेतकरी असून, बुधवारी रात्री त्यांच्या घराला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच घरातील सदस्यांनी बाहेर पळ काढला तर परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आग विझविण्यासाठी आटाेकाट प्रयत्न केले. या आगीत कपाटात ठेवलेले ७५ हजार रुपये राेख व इतर साहित्य जळाल्याने किमान एक लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती माेरेश्वर वैद्य यांनी दिली.
ती रक्कम मिरची विकून मिळाली हाेती. शिवाय, आगीत मुलांचे शैक्षणिक कागदपत्र जळाल्याचे त्यांनी सांगितले. घरात कापूसदेखील साठवून ठेवला हाेता. आग वेळीच नियंत्रणात आल्याने कापूस व इतर साहित्याचे फारसे नुकसान झाले नाही, असेही त्यांनी सांगितले. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती जाणकार व्यक्तींसाेबत माेरेश्वर वैद्य यांनी दिली. तलाठी देशमुख यांनी गुरुवारी (दि. ७) पंचनामा केला. शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.