पाचपावलीत तरुणीची भीषण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:09 AM2021-04-20T04:09:52+5:302021-04-20T04:09:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावलीच्या तांडापेठ - नाईक तलाव परिसरात एका तरुणीची अवैध धंद्यात गुंतलेल्या आरोपींनी भीषण हत्या ...

Horrible murder of a young woman in Pachpavli | पाचपावलीत तरुणीची भीषण हत्या

पाचपावलीत तरुणीची भीषण हत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचपावलीच्या तांडापेठ - नाईक तलाव परिसरात एका तरुणीची अवैध धंद्यात गुंतलेल्या आरोपींनी भीषण हत्या केली. पिंकी लखनलाल वर्मा (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

मूळची छत्तीसगड, राजनांदगाव येथील रहिवासी असलेली पिंकी नाईक तलाव परिसरात एका मैत्रिणीसह राहत होती. तिचा भाऊ वाठोड्यात राहतो. तांडापेठ भागात जुगार अड्डा, दारूअड्डा चालविणाऱ्या काही जणांसोबत तिचा वाद सुरू होता. तिने पाचपावली पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यावरून हा वाद तीव्र झाला होता. या पार्श्वभूमीवर, पिंकी सोमवारी दुपारी २च्या सुमारास तिच्या तांडापेठमधील घराबाहेर उभी असताना तीन आरोपी तेथे आले. त्यांनी पिंकीला घेरून शिवीगाळ करत, तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. दबंग स्वभावाच्या पिंकीने आरोपींचा प्रतिकार केला. नंतर जीव वाचविण्यासाठी बाजूच्या ईश्वर निखारे नामक व्यक्तीच्या घराकडे धावली. मात्र, मोठ्या प्रमाणात घाव बसल्याने आणि अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने ती निखारेंच्या दारासमोर पडली. ती मृत झाल्याचे लक्षात आल्याने आरोपी पळून गेले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी पोलिसांना माहिती देऊन पिंकीला बाजूच्या डॉक्टरकडे नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेजाऱ्यांना आरोपींची नावे विचारली. उपलब्ध झालेल्या माहितीवरून पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी धावपळ करीत होते.

----

आरती बोरकर हत्याकांडाची पुनरावृत्ती

काही वर्षांपूर्वी याच भागात शिवसेनेच्या पदाधिकारी आरती बोरकर यांचीही अशीच भीषण हत्या करण्यात आली होती. पिंकीही एका राजकीय पक्षाशी जुळली होती. ती या भागातील नागरिकांच्या मदतीला धावून जायची. पोलिसांशी तिचे सलोख्याचे संबंध होते. ती अवैध धंदेवाल्यांची मुखबिरी करून वरिष्ठांना माहिती देत असल्याचा आरोप होता.

---

१५ दिवसांचा इशारा भोवला

या भागात दुर्गेश मोना आणि युवराज नामक आरोपी अवैध दारू, सट्टा आणि जुगार अड्डा चालवितात. या भागातील युवकांचे भविष्य खराब होत असल्याचे सांगून पिंकीने त्यांना १५ दिवसांत सर्व धंदे बंद करा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा, असे म्हटले होते. त्यामुळेच आरोपींनी तिला संपविल्याची चर्चा या भागात आहे. पिंकीच्या नजीकच्या व्यक्तीनेही उपरोक्त आरोपींवर संशय व्यक्त केला आहे.

----

Web Title: Horrible murder of a young woman in Pachpavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.