भविष्य कठीण : राकेशकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केली शासनाची भूमिका नागपूर : आयकर (तपास) पुणे विभागाचे महासंचालक राकेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी काळा पैसा बाळगणाऱ्यांना इशारा दिला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत बेहिशेबी रक्कम घोषित करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा लाभ घेऊन पैसा सन्मानाने वापरण्यास पात्र व्हा. अन्यथा काळ्या पैशांचा लोभ करणाऱ्यांना भविष्यात कुणीही तारू शकणार नाही, असे त्यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले. राकेशकुमार गुप्ता हे केंद्र शासनाचा काळ्या पैशांविरुद्धचा लढा व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर मार्गदर्शन करण्यासाठी येथे आले होते. रामदासपेठेतील एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या एका निर्णयामुळे कसे होत्याचे नव्हते झाले याकडे त्यांनी सुरुवातीला लक्ष वेधले. केंद्र शासनाला काळा पैसा समूळ नष्ट करायचा आहे. त्यासाठी केंद्र शासन सुरुवातीपासूनच अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. शासनाच्या संबंधित निर्णयानंतर ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा एका क्षणात साधा कागद झाल्यात. अनेक करोडपती तत्काळ रोडपती झालेत. काळा पैसा पांढरा करण्याच्या पळवाटा बंद करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णयांत बदल केले. त्यावरून सर्वांनी बोध घेणे आवश्यक आहे असे गुप्ता यांनी सांगितले.पैसा बँकेत जमा केल्यामुळे पांढरा व जवळ बाळगल्यामुळे काळा होत नाही. पैशाचा स्रोत स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात कुणालाही काळा पैसा वापरता येणार नाही. आयकर विभाग आधुनिक तंत्रज्ञान वापरून अर्थव्यवस्थेचे शुद्धीकरण करीत आहे. विविध स्रोतांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन साठवलेली रक्कम घोषित करा. यामुळे नियमानुसार काही रक्कम सन्मानाने वापरण्यासाठी मिळेल. आयकर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास संपूर्ण अघोषित रक्कम हातातून जाईल व त्यावर ७ टक्के अधिकची रक्कमही द्यावी लागेल. याशिवाय अन्य कायदेशीर निर्बंध येतील ते वेगळेच असे गुप्ता यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
काळा पैसा बाळगणाऱ्यांना इशारा
By admin | Updated: January 4, 2017 02:22 IST